नवी दिल्ली: सध्याच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची वाढती लोकप्रियता प्रचंड प्रमाणात वाढत आहे. उत्तर प्रदेशात दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर योगींना पुढील पंतप्रधान बनवण्याची अनेकांची मागणी आहे. तशाप्रकारच्या अनेक पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान, अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर. खानने(Kamal R Khan) योगी आदित्यनाथ पंतप्रधान झाल्यानंतरच भारतात परतणार असल्याची शपथ घेतली आहे. तो सध्या आपल्या कुटुंबासोबत दुबईत राहतो.
लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, यापूर्वी कमाल आर खान म्हणजेच केआरकेने यूपीमध्ये भाजप आल्यास आणि योगी मुख्यमंत्री झाल्यास देशात परतणार नाही अशी शपथ घेतली होती. उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान केआरकेने सोशल मीडियावरील आपल्या एका पोस्टमध्ये लिहिले होते की, यूपीमध्ये पुन्हा भाजपची सत्ता आली तर तो भारतात कधीही येणार नाही. त्यावरुन कमाल खानला खूप ट्रोल करण्यात आले होते. योगी यूपीमध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांनी कमाल खानला त्याच्या ट्विटची आठवण करुन दिली, त्यावर कमाल खानने हा 'जुमला' असल्याचे म्हटले.
दरम्यान, आता केआरके आणखी एक शपथ घेऊन लोकांच्या निशाण्यावर आला आहे. KRK ने ट्विट केले- ''सर @myogiadityanath तुम्ही ज्या दिवशी भारताचे पंतप्रधान व्हाल, त्याच दिवशी मी भारतात परत येईन. 2024 मध्ये तुम्ही पंतप्रधान व्हाल, अशी अपेक्षा आहे. सर्व शुभेच्छा सर.'' त्याच्या या ट्विटवर एका यूजरने लिहिले - ''तू नाही आलास, तरी चालेल. राहुल गांधी बनतील, तेव्हा ये.'' दुसऱ्या एकाने लिहीले की, "2024 मध्ये तू रामपूरमधून आझम खानविरोधात निवडणूक लढव."