नवी दिल्ली- लोअर परळ येथील कमला मिल कम्पाऊंडमध्ये ट्रेड हाऊस इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 हून अधिक जखमी झाले आहेत. गुरुवारी ( 28 डिसेंबर ) इमारतीच्या टेरेसवर असलेल्या मोजोस बिस्ट्रो पबमध्ये भीषण असं अग्नितांडव घडलं. या घटनेवर सर्वसामान्य नागरिक तसंच राजकिय नेत्यांनी ट्विटरवरून दुःख व्यक्त केलं आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मराठी भाषेतून ट्विट करून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर मराठीतून ट्विट करण्यात आला आहे.
'मुंबई मधील कमला मिल्स कंपाऊंडमध्ये भीषण आग लागून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.पीडितांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या घटनेची त्वरीत चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे', असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ट्विट करत पीडित कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.
गुरुवारी रात्री साडे बाराच्या सुमारास कमला मिल कंपाऊंडमधी ‘१ अबव्ह’ या पबमध्ये आग लागली. इमारतीच्या टेरेसवर बांबू आणि प्लास्टिकचे छप्पर असल्याने आग झपाट्याने पसरत गेली. टेरेसवर ‘१ अबव्ह’ आणि त्याच्या बाजूला मोजोस ब्रिस्ट्रो पब आहे. आगीचे लोण तिथेही पोहोचले. या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. तर १२ हून अधिक जण जखमी झाले. पोलिसांनी ‘१ अबव्ह’ च्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.