Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 09:48 AM2024-06-02T09:48:51+5:302024-06-02T09:56:17+5:30
Lok Sabha Election 2024 Exit Poll Kangana Ranaut And Vikramaditya Singh : मंडी लोकसभेची ही जागा एक हाय-प्रोफाइल लढत म्हणून उदयास आली आहे, ज्यामध्ये दोन प्रमुख राजकीय व्यक्ती विजयासाठी इच्छुक आहेत.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील चारही जागा भाजपाला मिळतील असं म्हटलं जात आहे. India Today-Axis My India च्या एक्झिट पोलनुसार, काँग्रेस आपली मतं नक्कीच वाढवत आहे पण पक्षाला एकही जागा मिळणार नाही. मंडीच्या जागेवरही काँग्रेस पक्ष मागे पडू शकतो, तेथे सर्वेक्षणानुसार मतदारांचा अभिनेत्री आणि भाजपा उमेदवार कंगना राणौतवर अधिक विश्वास आहे.
मंडी लोकसभेची ही जागा एक हाय-प्रोफाइल लढत म्हणून उदयास आली आहे, ज्यामध्ये दोन प्रमुख राजकीय व्यक्ती विजयासाठी इच्छुक आहेत. एकीकडे सत्ताधारी भाजपाने पहिल्यांदाच राजकारणात उतरलेली सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिला उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांना या जागेवरून उमेदवारी दिली.
कंगना आणि विक्रमादित्य सिंह हे दोघेही आपापल्या निवडणूक रॅलींमध्ये एकमेकांना कडवी टक्कर देताना दिसले, जिथे दोन्ही नेत्यांच्या रॅलींमध्ये चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील कंगनाचा प्रचार केला, तर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनीही विक्रमादित्य यांच्या समर्थनार्थ रॅली काढल्या.
२०१९ लोकसभा निवडणुकीचा निकाल
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार राम स्वरूप शर्मा यांनी मंडी मतदारसंघातून ६,३८,४४१ मतं मिळवून विजय मिळवला. काँग्रेसचे आश्रय शर्मा दुसऱ्या क्रमांकावर होते. भाजपाच्या विजयाचं अंतर बऱ्यापैकी होतं पण नंतर पोटनिवडणुकीत ही जागा काँग्रेसच्या खात्यात आली. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह विजयी झाल्या.
२०१४ निवडणूक निकाल
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम स्वरूप शर्मा यांनी मंडी मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांना ३,६२,८२४ मते मिळाली, जी एकूण मतदानाच्या ४९.९४% होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा सिंह दुसऱ्या स्थानावर होत्या.
मंडी लोकसभा मतदारसंघ हा पारंपारिकपणे भाजपाचा बालेकिल्ला आहे आणि गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांचं वर्चस्व राहिलं आहे. तथापि, मंडीतील ४ जून २०२४ चा निकाल भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या हाय-प्रोफाइल उमेदवारांमुळे महत्त्वाचा ठरू शकतो.