पाटणा: विद्यार्थी नेता म्हणून प्रकाशात आलेले कन्हैया कुमार बिहारच्या बेगुसरायमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये महाआघाडी करण्यासाठी हालचाली सुरू होत्या. मात्र महाआघाडीनं तिकीट न दिल्यानं कन्हैया कुमार बेगुसराय मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणूक लढवणार आहे. पक्षाचे बिहार राज्याचे सचिव सत्यनारायण सिंह यांनी याबद्दलची माहिती दिली. कन्हैया कुमार बेगुसरायमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्यानं या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असणारे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह, मोदी लाटेतही स्वत:चा ठसा उमटवणारे राष्ट्रीय जनता दलाचे तन्वीर हसन यांच्याशी कन्हैया कुमार यांना दोन हात करावे लागणार आहेत. जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील निवडणुकांमध्ये यशस्वी राजकारण करत तरुणांमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या कन्हैया कुमार यांना इतर डाव्या पक्षांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
कन्हैया कुमार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; सीपीआयकडून बेगुसरायमधून उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 12:19 PM