"23 किलो सोनं माझं नाही...";पीयूष जैनच्या घरी छापेमारीत सापडलेली 197 कोटींची रोख रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 10:09 AM2024-01-31T10:09:15+5:302024-01-31T10:12:16+5:30
कानपूरमध्ये राहणारा व्यावसायिक व्यापारी पीयूष जैनच्या घरावर छापा टाकला होता आणि 197 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती.
कानपूरचा व्यावसायिक पीयूष जैन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पीयूष जैन हा तोच व्यावसायिक आहे ज्यांच्या जागेवर डीजीजीआयने तीन वर्षांपूर्वी मोठा छापा टाकला होता. ज्यामध्ये तब्बल 197 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली. याशिवाय 23 किलो सोन्याची बिस्किटेही सापडली आहेत. आता पीयूष जैनने हे 23 किलो सोने सरेंडर केलं आहे.
2021 च्या अखेरीस, DGGI (Directorate General of GST Intelligence)अहमदाबादच्या टीमने कानपूरमध्ये राहणारा व्यावसायिक व्यापारी पीयूष जैनच्या घरावर छापा टाकला होता आणि 197 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती. यानंतर त्याच्या कनौज येथील फॅक्टरी आणि हवेलीवर छापा टाकून 23 किलो सोने आणि चंदनाचं तेल जप्त करण्यात आलं. याप्रकरणी पीयूष जैन तुरुंगात गेला होता.
कन्नौजमध्ये सोनं सापडल्याप्रकरणी लखनौच्या डीआरआय टीमने पीयूष जैन यांच्याविरुद्ध 135 कस्टम ॲक्ट अंतर्गत एफआयआर दाखल केला होता. ज्याची केस चालू होती. या प्रकरणी आता पीयूष जैनच्या वतीने न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे की, माझ्या जागेवरून कस्टमने जप्त केलेलं 23 किलो सोने कंपाऊंडिंग करण्यात यावं. याआधी त्याने सोन्यावर दावा ठोकला होता. ज्याची 60 लाखांची पेनल्टी जमा केली होती. तसेच त्याला आपल्या बाजुने ते रिलीज करण्याचं अपील देखील केलं आहे.
कानपूरमधील डीजीजीआयचे सरकारी वकील अंबरीश टंडन म्हणतात की, पीयूष जैनने 56 लाख 86 हजार रुपये कंपाउंडिंग फी जमा केली आहे आणि दावा केला आहे की त्यांच्या घरातून जप्त केलेले 23 किलो सोने कंपाऊंड करावं. म्हणजेच एकप्रकारे त्याने हे सोने सरेंडर केलं आहे. या प्रकरणी आता कस्टमच्या कलम 135 मधून दिलासा मिळावा यासाठी कोर्टाकडे अपील केलं आहे. वकिलांच्या म्हणण्यानुसार आता त्यांच्यावतीने जबाब नोंदवला जाणार आहे.
कन्नौजमध्ये 27 डिसेंबर 2021 रोजी डीजीजीआय अहमदाबादच्या टीमने पीयूष जैन यांच्या घरातून 23 किलो सोन्याची जप्ती दाखवली होती आणि हे सोनं विदेशी असल्याचा दावा केला होता. मात्र आता पीयूष जैन आपल्याला हे सोनं नको असल्याचा दावा करत आहेत. त्याने सोन्याचा दावा करणारं आपलं अपील देखील मागे घेतलं आहे. तसेच कम्पाउंडींग फी जमा केले. सध्या पीयूष जैन जामिनावर तुरुंगातून बाहेर आला आहे.