कडाक्याच्या थंडीत एका 72 वर्षीय व्यक्तीने 70 किलोमीटर सायकल चालवून कानपूरमधील पोलीस आयुक्त कार्यालय गाठले आणि आपल्या घरची वेदनादायक गोष्ट सांगितली. वृद्धाची सून पती आणि मुलांना सोडून प्रियकरासह पळून गेली आहे. सुनेला परत आणण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात दाद मागितली, मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने सासऱ्यांनी 70 किलोमीटर सायकलवरून जाऊन पोलीस आयुक्तांची भेट घेतली. पोलीस आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे.
राम प्रसाद असं या वृद्ध व्यक्तीचं नाव आहे. राम प्रसाद यांनी आरोप केला आहे की, त्यांची सून 15 दिवसांपूर्वी सुमित नावाच्या तरुणासोबत पती आणि मुलांना सोडून दागिने आणि पैसे घेऊन पळून गेली आहे. राम प्रसाद सांगतात की, मी घाटमपूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवण्यासाठी गेलो होतो, पण पोलिसांनी परत पाठवलं, त्यामुळे आता मी 70 किलोमीटर सायकलने आयुक्तांकडे आलो आहे.
राम प्रसाद कानपूरच्या घाटमपूर भागातील दहेली गावात राहतात. त्यांचा मुलगा, सून आणि त्यांना दोन मुलेही आहेत. सुनेचे नौबस्ता येथील रहिवासी असलेल्या सुमितसोबत प्रेमसंबंध होते आणि 15 दिवसांपूर्वी सुमित त्याचा मित्र करणसोबत आला आणि त्याने सुनेला घरातून पळवून नेले. यानंतर राम प्रसाद आणि त्यांचा मुलगा घटमपूर पोलीस ठाण्यात सुनेची तक्रार करण्यासाठी गेले होते. हे प्रेम प्रकरण असल्याचे सांगून पोलिसांनी राम प्रसादला पोलीस ठाण्यातून परत पाठवले.
पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. राम प्रसाद सायकलवरून आयुक्तांकडे तक्रार करण्यासाठी आले. वृद्धाची अवस्था पाहून खुद्द आयुक्तांचेही मन हेलावले. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश त्यांनी घाटमपूर पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणी घाटमपूरचे एसीपी दिनेश शुक्ला यांनी सांगितले की, वृद्धाच्या तक्रारीवरून प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"