कानपूर: उत्तर प्रदेशातील कानपूरच्या चकेरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एक धक्कादायक घटना घडली आहे. जाजमऊ चुंगीजवळ घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही तरुणांनी एका व्यक्तीला गाडीच्या बोनटवर लटकवलं आणि कार सुस्साट पळवली. रस्त्याशेजारी असलेल्या एका इमारतीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीनं घटनेचा व्हिडीओ चित्रित केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला. व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती आणि कारची ओळख पटवण्याचं काम पोलिसांनी सुरू केलं आहे. यासाठी पोलिसांनी सर्वसामान्यांकडे मदतीचं आवाहन केलं आहे.
उपलब्ध माहितीनुसार, एक वॅगन आर आणि डीसीएम यांची धडक झाली. ही धडक फार मोठी नव्हती. त्यानंतर वॅगन आरमधील व्यक्तींनी डीसीएम चालकाला कारच्या बोनटवर लटकवलं. त्यानंतर ते कारमध्ये बसले आणि ती भरधाव वेगानं पळवली. डीसीएम चालक कसाबसा बोनेटला धरून राहिला. ही संपूर्ण घटना एका तरुणानं त्याच्या घराच्या छतावरून कॅमेऱ्यात कैद केली. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या वॅगन आर गाडीचा क्रमांक किंवा या घटनेशी कोणतीही माहिती असल्यास ती पोलिसांना देण्याचं आवाहन उपायुक्त अनुप कुमार यांनी केलं आहे. याशिवाय पोलीस आसपासच्या परिसरातील सीसीटीव्हींचं फुटेजदेखील तपासून पाहत आहेत. आरोपी लवकरच पकडले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.