Kargil Vijay Diwas : यांच्या शौर्यासमोर मृत्यूही हरला; 15 गोळ्या झेलूनही शत्रूला मात देणाऱ्या योगेंद्र यादव यांची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 09:42 AM2019-07-26T09:42:17+5:302019-07-26T09:42:52+5:30

1999 मध्ये झालेल्या या युद्धात भारतीय लष्करामधील अनेक जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवत पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले होते. याच शूरवीरांमधील एक नाव म्हणजे सुभेदार योगेंद्र यादव.

Kargil Vijay Diwas: The story of Yogendra Yadav, who defeated the enemy even after Seriously injuries | Kargil Vijay Diwas : यांच्या शौर्यासमोर मृत्यूही हरला; 15 गोळ्या झेलूनही शत्रूला मात देणाऱ्या योगेंद्र यादव यांची कहाणी

Kargil Vijay Diwas : यांच्या शौर्यासमोर मृत्यूही हरला; 15 गोळ्या झेलूनही शत्रूला मात देणाऱ्या योगेंद्र यादव यांची कहाणी

Next

नवी दिल्ली - देशात आज कारगिल विजयाचा 20 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 1999 मध्ये झालेल्या या युद्धात भारतीय लष्करामधील अनेक जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवत पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले होते. याच शूरवीरांमधील एक नाव म्हणजे सुभेदार योगेंद्र यादव.  टायगर हिलवर असलेल्या शत्रूचे तीन बंकर्स उद्ध्वस्त करण्यासाठी सुरू केलेल्या कारवाईदरम्यान, योगेंद्र यादव पाकिस्तानी सैनिक आणि घुसखोरांनी केलेल्या गोळीबारात जबर जखमी झाले होते. मात्र शरीरात 15 गोळ्या घुसल्या असतानाही योगेंद्र यादव लढत राहिले. यादरम्यान, त्यांनी पाकिस्तानच्या अनेक सैनिकांना ठार केले. गंभीर जखमी असतानाही त्यांनी दाखवलेले शौर्य आणि मिळवलेल्या महत्त्वपूर्ण माहितीमुळे भारतीय लष्कराला टायगर हिलवर तिरंगा फडकवणे सोपे गेले. या अतुलनीय शौर्याबद्दल सुभेदार योगेंद्र यादव यांना परमवीर चक्र देऊन गौरवण्यात आले. हयात असताना परमवीर चक्र मिळवणारे सुभेदार योगेंद्र यादव मोजक्या जवानांपैकी एक आहेत. 


सध्या लष्करात सुभेदार मेजर पदावर कार्यरत असलेले योगेंद्र यादव 1999 मध्ये कारगिल युद्धाची पार्श्वभूमी तयार होत असताना नुकतेच प्रशिक्षण संपवून लष्करात दाखल झाले होते. लष्करातील 18 ग्रेनेडियर्समध्ये असलेल्या योगेंद्र यादव यांना आपल्याला युद्ध आघाडीवर जावे लागेल याची कल्पनाही नव्हती. दरम्यान, त्यांच्या घातक प्लाटूनकडे कारगिल युद्धात सर्वात महत्त्वाचे ठरलेले टायगर हिल शिखर फत्ते करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. 

योगेंद्र यादव यांच्यासह 21 जवानांनी खडा कडा पार करत टायगर हिलच्या दिशेने कूच केले. दरम्यान, या तुकडीने पाकिस्तानी सैन्याचा एक बंकर उद्ध्वस्त केला. मात्र पुढे आगेकूच करेपर्यंत योगेंद्र यादव यांच्यासह केवळ 7 जवान बचावले. दरम्यान, या जवानांचा शोध घेण्यासाठी आलेल्या 10-12 पाकिस्तानी जवानांना योगेंद्र यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठार केले. मात्र त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने पुन्हा हल्ला केला. यात योगेंद्र यादव यांचे सर्व सहकारी शहीद झाले. त्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी वीरमरण आलेल्या भारतीय जवानांच्या शरीरावर गोळ्या झाडणे सुरू ठेवले. योगेंद्र यादव असहायपणे हे सारे पाहत होते. 

दरम्यान, गंभीर जखमी झालेले योगेंद्र यादव निपचित पडून राहिले. त्यांच्यावरही गोळ्या झाडल्या गेल्या मात्र त्या वेदना सहन करत त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. अखेरीस एका पाकिस्तानी सैनिकाने योगेंद्र यादव यांच्या छातीच्या दिशेने बंदूक रोखून गोळी झाडली. मात्र खिशात असलेल्या पाच-पाच रुपयांची नाणी ठेवलेल्या पाकिटामुळे योगेंद्र यादव बचावले.  

काही वेळाने शुद्ध आली तेव्हा आपल्या आसपास पाकिस्तानी सैनिक उभे असल्याचे योगेंद्र यादव यांनी पाहिले. त्यावेळी बाजूला पडलेले एक ग्रेनेड योगेंद्र यादव यांना दिसले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता ते ग्रेनेड शत्रू सैनिकांच्या दिशेने फेकले. यात तीन पाकिस्तानी सैनिक ठार झाले.  

दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या योगेंद्र यादव यांना चालता येणेही अशक्य झाले होते. गोळ्यांमुळे चाळण झालेला एक हात लटकत होता. अशा परिस्थितीतही आजूबाजूला पडलेल्या रायफल्स पोझीशनवर घेत यादव यांनी समोरून चाल करून आलेल्या पाकिस्तानी सैनिकांवर गोळीबार सुरू केला. त्यामुळे पाकिस्तानी सैनिक गोंधळले आणि मागे हटले. दरम्यान, मुच्छित झालेले योगेंद्र यादव उरातावरून घरंगळत खालच्या दिशेने आले. तेवढ्यात भारताची दुसरी तुकडी तिथे पोहोचली. त्यांनी योगेंद्र यादव यांना प्रथमोपचार करून बेस कॅम्पकडे हलवले. यादरम्यान, शत्रूबाबतची अत्यंत महत्त्वाची माहिती योगेंद्र यादव यांनी सहकाऱ्यांना दिली. त्यानंतर भारतीय जवानांनी कारवाई सुरू करून अल्पावधीत टायगर हिल फत्ते केले. 

 गंभीर जखमी झाल्यानंतरही पाकिस्तानी सैन्याला थोपवून धरणाऱ्या योगेंद्र यादव यांनी नंतर मृत्यूलाही मात दिली. कारगिल युद्धादरम्यान त्यांनी दाखवलेल्या या साहसासाठी योगेंद्र यादव यांना सैन्य दलातील सर्वोच्च असे परमवीर चक्र देऊन सन्मानीत करण्यात आले. 

Web Title: Kargil Vijay Diwas: The story of Yogendra Yadav, who defeated the enemy even after Seriously injuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.