Karnatak : काँग्रेस-जेडीएसमध्ये मंत्रिपदांनंतर व्हीआयपी जागांवरून रस्सीखेच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 10:37 PM2018-05-22T22:37:49+5:302018-05-22T22:37:49+5:30
कर्नाटकमध्ये सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर आता काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरमध्ये वेगळ्याच कारणावरून रस्सीखेच सुरू झाली आहे.
बंगळुरू - कर्नाटकमध्ये सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर आता काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरमध्ये वेगळ्याच कारणावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. कर्नाटकमध्ये नव्या सरकारचा शपथविधी बुधवारी होणार आहे. या शपथविधी सोहळ्यात उपस्थितासांठी ठेवण्यात येणाऱ्या व्हीआयपी आसनांमध्ये अधिकाधिक वाटा मिळवण्यासाठी काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरमध्ये रस्सीखेच रंगली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकमधील सत्तेतील भागीदारीबरोबरच शपथविधी सोहळ्यात ठेवण्यात येणाऱ्या सहा हजार व्हीआयपी आसनांसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या आसनांपैकी समाधानकारक आसने मिळण्याबाबत काँग्रेस चिंतीत आहे. काँग्रेसचे राज्यातील नेते जनता दल सेक्युलरच्या कार्यपद्धतीबाबत जाणून आहेत. त्यामुळे जनता दल सेक्युलर आपल्या नेत्यांसाठी अधिकाधिक आसने बळकावणार तर नाही ना, अशी भीती काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. तसेच कर्नाटक विधानसौधच्या परिसरात जेडीएसकडून असे पोस्टर लावण्यात आले आहेत.
दरम्यान, कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर यांच्यात सुरू असलेल्या सत्तास्थापनेबाबतच्या वाटाघाटी संपुष्टात आल्या असून, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसचे दलित नेते जी. परमेश्वर यांचे नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी निश्चित करण्यात आले आहे. ही माहिती कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री आणि जनता दल सेक्युलरचे नेते एच.डी कुमारस्वामी यांनी दिली.