कर्नाटक सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचं गिफ्ट; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 03:49 PM2018-07-05T15:49:08+5:302018-07-05T15:53:36+5:30
कर्नाटकात आज काँग्रेस-जेडीएस आघाडीचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी अर्थसंकल्प सादर केला.
बंगळुरू- कर्नाटकात आज काँग्रेस-जेडीएस आघाडीचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतक-यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. परंतु दुसरीकडे पेट्रोल, डिझेल आणि विजेचे दर वाढवण्यात आले आहेत. कुमारस्वामी यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची काही प्रमाणात पूर्तता करण्याचा प्रयत्न केला आहे.
2 लाख किंवा त्याहून कमी पैशांचं कर्ज घेणा-या शेतक-यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. कुमारस्वामी यांनी कर्जमाफीसाठी 34000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतक-यांना अंशत: दिलासा देतानाच कुमारस्वामी सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला याचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
कुमारस्वामी यांनी 2, 13, 734 कोटींच्या अर्थसंकल्पाची घोषणा केली. त्यात ते सिद्धरामय्या सरकारच्या कार्यकाळातील सर्व योजना सुरूच ठेवणार आहेत. कुमारस्वामी यांनी सेवा आणि कृषी क्षेत्रावर जास्त लक्ष केंद्रित केलं आहे. 2016-17मध्ये वृद्धी दर 7.5 टक्के होता तो 2017-18ला वाढून 8.5 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. सरकारनं आपल्या जाहीरनाम्यातून दिलेल्या घोषणा काही प्रमाणात पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. 31 डिसेंबर 2017मधल्या पहिल्या टप्प्यात काही शेतक-यांचं कर्ज माफ करणार आहे. तसेच ज्या शेतक-यांनी वेळेवर कर्ज फेडलं आहे, अशा शेतक-यांना सरकार 25,000 रुपये देणार आहे.
अर्थसंकल्पात पेट्रोलवरी कर 30वरून 32 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, तर डिझेलवरचा कर 19 टक्क्यांवरून 21 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 1.14 रुपये, डिझेलच्या दरात प्रतिलिटर 1.12 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच विजेचे दर 20 पैशांनी वाढवण्यात आले आहे.