...म्हणून 'त्या' बस कंडक्टरनं सोशल मीडियावर स्वत:ची किडनी विकायला काढली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 03:58 AM2021-02-13T03:58:31+5:302021-02-13T07:56:48+5:30
आर्थिक स्थिती बिघडल्याचा परिणाम; कर्नाटकात उडाली खळबळ
बंगळुरू : रोजच्या रोज महागाई वाढत चालली आहे आणि लॉकडाऊनच्या काळात पगारात मात्र कपात झाली आहे. अशा स्थितीत कुटुंबाचा रोजचा खर्च भागविणे अनेकांना अवघड झाले आहे. अशा स्थितीत कनार्टक राज्य परिवहन कंपनीमध्ये (केएसआरटीसी) बस कंडक्टर म्हणून काम करणाऱ्या हनुमंत कालेगर यांनी आपली किडनीच विकायला काढली आहे.
आपल्याला किडनी विकायची आहे, असे हनुमंत कालेगर यांनी स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जाहीर केले आहे. जेमतेम ३८ वर्षांच्या या कंडक्टरने म्हटले आहे की, आमच्या पगारामध्ये कपात झाली आहे. त्यामुळे आपणास दैनंदिन खर्च करणे अवघड झाले आहे. कुटुंबाचे हाल होत आहेत. त्यामुळे आपण किडनी विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून काही रक्कम मिळू शकेल, अशी हनुमंत कालेगर यांची अपेक्षा आहे. ज्यांना किडनी हवी आहे, त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करताना या बस कंडक्टरने स्वत:चा मोबाइल क्रमांकही पोस्ट केला आहे. (वृत्तसंस्था)
मुलाला पाठवले
हनुमंत कालेगर हे उत्तर पूर्व कर्नाटकात गंगावती डेपोमध्ये कार्यरत आहेत. मुलांचे शिक्षण, आई- वडिलांचा औषधींचा खर्च यासाठी पैशांची आवश्यकता आहे. आपल्या चौथीच्या मुलाला शिक्षणासाठी आजी- आजोबांकडे पाठविले असल्याचेही त्यांनी सांगितले.
मंडळाचा वेगळा दावा
राज्य परिवहनच्या कोप्पल विभागीय नियंत्रण एम. ए. मुल्ला यांनी मात्र हनुमंत कालेगर नियमित कामावर येत नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, हा कंडक्टर रोज व नियमित कामावर येत नसल्यामुळेच त्याला कमी पगार मिळत आहे. याबाबत आपण त्याच्या कुटुंबीयांशीही बोललो होतो.
घरभाड्यासाठी पैसे नाहीत
कोरोना साथीच्या काळात माझी आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक खराब झाली. मी परिवहन कंपनीचा कर्मचारी असून माझ्याकडे घराचे भाडे भरण्यासाठी आणि रेशन विकत घेण्यासाठीही पैसे नाहीत. त्यामुळे मी माझी किडनी विक्री करणार आहे.
- हनुमंत कालेगर