नवी दिल्ली- पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर विरोधकांनी सरकारबरोबर असल्याचं म्हटलं होतं. परंतु विरोधकांमध्ये काही नेते असेही आहेत, जे दहशतवादाविरोधातील लढाईला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामींनी असंच एक वादग्रस्त विधान केलं आहे. पहिल्यांदा आपल्या देशातील दहशतवाद संपवा, असं ते मोदींना उद्देशून म्हणाले आहेत.पुलवामा हल्ल्यानंतर पूर्ण देशात जनक्षोभ उसळतोय. जनता पाकिस्तान आणि दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदविरोधात कारवाई करण्याची मागणी करत आहे. सीआरपीएफच्या शहीद जवानांचा बदला घेण्याची इच्छा भारतीयांमध्ये प्रबळ आहे. परंतु कुमारस्वामी वादग्रस्त विधान करून या दहशतवादविरोधातील लढाईला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. कुमारस्वामी म्हणाले, पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानं या घटनेचं दुःख कमी होणार नाही. सरकारनं अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी कडक पावलं उचलली पाहिजेत. पहिल्यांदा आपण आपल्या देशातल्या दहशतवादाच्या समस्येचं समाधान शोधलं पाहिजे.14 फेब्रुवारीला पुलवाम्यात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदनं स्वीकारली होती. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांना कडक शब्दांत संदेश दिला होता. दहशतवाद्यांनी मोठी चूक केली आहे. त्यांना त्यांच्या कृत्याची नक्कीच शिक्षा मिळेल. त्यानंतर राहुल गांधींहीही आम्ही सरकारबरोबर असल्याचं सांगितलं. पुलवामा हल्ल्यानंतर पूर्ण देशा आणि विरोधी पक्ष सरकारबरोबर आहे. परंतु कुमारस्वामींनी त्यांच्याविरोधात विधान केलं आहे.
दहशतवादाच्या समस्येला भारतच जबाबदार; कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामींचं तर्कट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 1:20 PM