बंगळुरू - कर्नाटक विधानसभा निवडणूक एप्रिल-मे महिन्यात लढण्यात येणार आहे. पण त्यापूर्वीच वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर तर आतापासूनच काँग्रेस आणि भाजपानं एकमेकांवर चिखलफेक करण्यास सुरुवातदेखील केली आहे. काँग्रेसनं 1 मिनिट 19 सेकंदांचा भाजपाच्या विरोधातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काँग्रेसनं भाजपाचा 'बीफ जनता पार्टी' असा उल्लेख केला आहे.
'बीफ'बाबत भाजपाची दुटप्पी भूमिका असल्याचे या व्हिडीओमध्ये ग्राफिक्सच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. 'गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर बीफ आयात करू इच्छितात, योगी आदित्यनाथ बीफ निर्यात करू इच्छितात, केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी बीफ खाण्याची इच्छा आहे, तर काहींना बीफची विक्री करायची आहे'. ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओच्या माध्यामातून भाजपा बीफबाबत वेगवेगळ्या भूमिका का अवलंबत आहे?, असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
दरम्यान, काँग्रेस सांप्रदायिक वाद पसरवत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे कर्नाटकातील प्रवक्ते एस. प्रकाश यांनी दिली आहे. पुढे ते असंही म्हणालेत की, ''सुरुवातीला काँग्रेसनं आम्हाला दहशतवादी पार्टी म्हटले होते, आता बीफ जनता पार्टी म्हणत आहेत. हे सर्व कशासाठी?. हा समाजात फूट पाडण्याचाच एक प्रयत्न आहे'', असा आरोपही त्यांनी केला.
तर दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासंदर्भात तयार करण्यात आलेल्या 1 मिनिट 39 सेकंदांच्या व्हिडीओवर काँग्रेसनं संताप व्यक्त केला आहे. ''बिर्याणीमध्ये हिंदू कार्यकर्त्यांचं रक्त मिसळलेलं आहे आणि ही बिर्याणी दिनेश गुंडु राव मिलिट्री हॉटेलमध्ये मिळते'', असे या व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे. गुंडु राव हे प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आहेत.
यावर दिनेश गुंडु राव म्हणालेत की, मस्करीपर्यंत सारं काही मर्यादीत राहावं. याद्वारे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. दरम्यान, या दोन्ही व्हिडीओंपूर्वी एक मिनिट 5 सेकंदांचा व्हिडीओ दिल्ली काँग्रेसकडून जारी करण्यात आला होता. या व्हिडीओद्वारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. आदित्यनाथ यांच्यावर किती खटले दाखल आहेत, शिवाय त्यांच्या हिदुत्ववादी अजेंड्यालादेखील या व्हिडीओमधून टार्गेट करण्यात आले होते.