बंगळुरू- कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनी सिद्धरामय्या समर्थक आमदारांकडून होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपद सोडण्याची धमकी दिली आहे. काँग्रेस आमदार स्वतःची मर्यादा ओलांडत आहेत. त्यांना लगाम घालण्याची गरज आहे. विशेष म्हणजे सिद्धरामय्या समर्थक कुमारस्वामींना लक्ष्य करत असतानाच त्यांनी पद सोडण्याची धमकी दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कुमारस्वामी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत म्हणाले, काँग्रेस नेतृत्वानं या सर्व मुद्द्यांकडे लक्ष दिलं पाहिजे.मी यामुळे फार चिंतेत आहे. जर असेच प्रकार सुरू राहिले, तर मी पद सोडण्यासाठी तयार आहे. काँग्रेस नेत्यांनी स्वतःच्या आमदारांना नियंत्रणात ठेवलं पाहिजे. कुमारस्वामी यांनी पद सोडण्याची धमकी दिल्यानंतर काँग्रेस आमदारांकडूनही प्रतिक्रिया आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते परमेश्वरा म्हणाले, सिद्धरामय्या सर्वश्रेष्ठ मुख्यमंत्री राहिले आहेत. ते आमच्या काँग्रेस आमदारांचे गटनेते आहेत. आमदारांसाठी तेच मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी स्वतःची मतं मांडली आहेत. त्यात चुकीचं काय आहे ?, आम्ही कुमारस्वामीच्या सरकारमध्येही खूश आहोत. गेल्या काही दिवसांपासून जेडीएस आणि काँग्रेस आमदारांमधील मतभेद पराकोटीला गेले आहेत. त्यामुळेच कुमारस्वामी यांनी कॅबिनेटची बैठकही रद्द केली आहे.
माजी मुख्यमंत्री राहिलेल्या सिद्धरामय्या यांच्या समर्थक आमदारांनी कुमारस्वामींवर जोरदार हल्ला चढवला आहे. सिद्धरामय्या समर्थकांनी रविवारी एका कार्यक्रमात त्यांचं स्वागत केलं. या दरम्यान ते काँग्रेसचे मंत्री सी पुत्तरंगा शेट्टी यांच्याबरोबर होते. त्यावेळी काँग्रेसचे आमदार म्हणाले, आम्ही आताही सिद्धरामय्या यांनाच मुख्यमंत्री मानतो. कर्नाटक सरकारवर टीका करत काँग्रेस आमदार एसटी सोमशेखर म्हणाले, आघाडीच्या सरकारला 7 महिने झाले आहेत, परंतु अद्यापही विकासाच्या नावावर काहीही केलेलं नाही. जर सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळासाठी आणखी पाच वर्षं मिळाली असती तरी त्यांनी खरा विकास कसा करतात हे दाखवून दिलं असतं.