'मी 700 कोटी मागितले, येडियुरप्पा यांनी 1000 कोटी दिले'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 02:53 PM2019-11-06T14:53:01+5:302019-11-06T15:01:38+5:30
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कृष्णराजपेट मतदारसंघाच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपये दिले आहेत.
बंगळुरू - कर्नाटकचे अपात्र ठरलेले आमदार नारायण गौडा यांनी एक मोठा दावा केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कृष्णराजपेट मतदारसंघाच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपये दिले आहेत. मात्र मी त्यांच्याकडे 700 कोटी मागितले होते. मिळालेले पैसे हे विकासकामांसाठी खर्च झाले असल्याचं नारायण गौडा यांनी म्हटलं आहे. एनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
'पहाटे पाच वाजता एक जण (कर्नाटकात एचडी कुमारस्वामीचं सरकार असताना) माझ्याकडे आला आणि मला येडियुरप्पा यांच्या निवासस्थानी नेलं. जेव्हा आम्ही येडियुरप्पा यांच्या निवासस्थानी दाखल झालो, तेव्हा ते देवपूजा करत होते. मी आत गेल्यानंतर त्यांनी बसायला सांगितलं. मुख्यमंत्रिपदासाठी आपल्याला पाठिंबा द्यावा असं आवाहन येडियुरप्पांनी केलं' अशी माहिती आमदार नारायण गौडा यांनी समर्थकांशी संवाद साधताना दिली आहे.
मी 700 कोटी मागितले, येडियुरप्पांनी 1000 कोटी दिल्याचं देखील गौडा यांनी म्हटलं आहे. 'मी कृष्णराजपेट मतदारसंघाच्या विकासासाठी 700 कोटी रुपये मंजूर करण्याची विनंती केली. त्यांनी 300 कोटी रुपये जास्त देण्याचं आश्वासन दिलं. यानंतर त्यांनी तो निधी मंजूरही केला. अशा चांगल्या माणसाला आपण समर्थन देऊ नये का? मी याच कारणांमुळे पाठिंबा दिला. अपात्र ठरलेल्या आमदारांशी माझा काहीही संबंध नसल्याचंही येडियुरप्पांनी यानंतर सांगितलं' असं नारायण गौडा यांनी म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कन्नड भाषेवर जोर देत कन्नड संस्कृती रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं सांगत अमित शहा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी हिंदी भाषेवरुन जर देशाला कोणती भाषा एकत्र आणू शकते ती हिंदी आहे असं वक्तव्य केलं होतं. मात्र या वक्तव्यावरुन दक्षिणेकडील अनेक नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. येडियुरप्पा यांनी ट्विट करत सांगितले आहे की, देशात सर्व भाषा एकसमान आहेत. कर्नाटकात कन्नड ही प्रमुख भाषा आहे. आम्ही कधीच कन्नड भाषेसोबत तडजोड करणार नाही. कन्नड भाषा आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असं त्यांनी सांगितले होते.