कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु होण्यापूर्वी आणि मतदानाच्यावेळीही काही मतदानकेंद्रांवर गोंधळ झाला. निवडणूक ड्युटीवर नेमण्यात आलेल्या सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी अन्न-पाण्याची सोय करण्यात आलेली नसल्याने त्यांचा संताप उफळून आला. तर मतदान सुरु झाल्यावर पोलिंग एजंट हे त्याच बुधमधील मतदार असणे आवश्यक असल्याचा नियम सांगण्यात आल्याने काही ठिकाणी बाचाबाचीही झाली.
बेळगाव जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. राज्यात इतरत्रही तसेच चित्र आहे. त्यामुळे अकरापर्यंतच मतदानाची टक्केवारी २४ टक्क्यांवर पोहचली. आज मतदानाची वेळ एकतासाने वाढवली असल्याने टक्केवारी चांगली वाढण्याची शक्यता आहे. मात्र सकाळी मतदान सुरु झाल्यावर काही मतदानकेंद्रांवर गोंधळ झाला. निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानकेंद्रांवरील राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे पोलिंग एजंट हे त्याच केंद्रातील मतदार असावेत असा नियम सांगितल्याने वाद निर्माण झाला. अनेक उमेदवारांसाठी ऐनवेळी प्रभाव नसलेल्या ठिकाणी पोलिंग एजंट मिळवणे कठिण होते. मात्र या गोंधळाची सुरुवात शुक्रवारपासूनच झाली. मतदानयंत्रे, व्हीव्हीपॅट युनिट आणि इतर साहित्य घेऊन मतदान केंद्रावर निघालेल्या सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी काहीच व्यवस्था नव्हती. काही ठिकाणी या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्थाच केलेली नव्हती, त्यामुळे त्यांच्यात नाराजी निर्माण झाली. हुबळीसारख्या ठिकाणी तर घोषणाही देण्यात आल्या. दुपारनंतरही भोजनाची व्यवस्था न झाल्याने अनेकांना त्रास झाल्याच्याही तक्रारी आल्या. “आमच्यापैकी बहुतेक चाळीशी ओलांडलेले आहेत. त्यांच्यापैकी अनेकांना हायपरटेन्शन, ह्रदयविकार, मधुमेह असे त्रास आहेत. त्यामुळे त्यांना वेळेवर जेवण तसेच पाणी मिळणे आवश्यक होते. मात्र त्याची व्यवस्था केली नव्हती. आम्ही काही भिकारी नाही, असे वागवायला...” अशा संतप्त प्रतिक्रिया निवडणूक ड्युटीवरील कर्मचारी व्यक्त करीत होते.
काही ठिकाणी भोजन-पाण्याची व्यवस्था होती. मात्र मतदान ड्युटीवरील कर्मचाऱ्यांच्या संख्येचा अंदाज न घेता केली गेल्याने ती व्यवस्था पुरेशी नव्हती. विजयपुरात कर्मचाऱ्यांना साहित्य वितरणाची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या सरकारी कर्मचाऱ्याचे निधन झाले. ते मतदान यंत्र देत असताना त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचा मृत्यू ओढवला. याच भागात कर्मचारी आणि साहित्य पाठवण्यासाठीच्या गाड्यांमध्ये इंधन भरलेले नसल्याने त्या निघू शकल्या नव्हत्या. त्यामुळे उशीर झाला. त्याची गंभीर दखल घेत तीन अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली.