देशाच्या कानाकोपऱ्यातून काँग्रेसचा सफाया होतोय- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 01:31 PM2018-05-03T13:31:28+5:302018-05-03T13:31:28+5:30
कर्नाटकमध्ये मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
बंगळुरू: काँग्रेसमुळे कर्नाटकमधील जनतेची पाच वर्षे वाया गेली. मात्र यापुढे असं होणार नाही, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर तोफ डागली. देशाच्या कानाकोपऱ्यातून काँग्रेसचा सफाया होतोय. जिथे पाहाल तिथे काँग्रेसचा धुव्वा उडतोय, असंही मोदींनी यावेळी म्हटलं. ते कलबुर्गीतील एका जनसभेला संबोधित करत होते.
पंतप्रधान मोदींनी स्थानिक भाषेत त्यांच्या भाषणाची सुरुवात केली. 'निवडणुका येत-जात राहतात. मात्र इतक्या मोठा जनसागर कधीकधीच पाहायला मिळतो. कर्नाटकमधील जनता यापुढे काँग्रेस सरकारला सहन करणार नाहीत. काँग्रेसच्या राजवटीत कर्नाटकमधील जनतेची पाच वर्षे वाया गेली. मात्र यापुढे असं घडणार नाही,' असं मोदींनी म्हटलं. ही निवडणूक फक्त जिंकण्या-हरण्यापुरती मर्यादित नाही. ही निवडणूक तरुणांचं भविष्य ठरवणारी आहे, असं मोदी म्हणाले. 'कर्नाटकात आमचं सरकार आल्यास केंद्र आणि राज्य सरकार खांद्याला खांदा लावून विकासासाठी काम करेल,' अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
कलबुर्गीतील या सभेत बोलताना मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाचा उल्लेख केला. 'सरदार वल्लभभाई पटेल यांचं कर्नाटकशी खूप जवळचं नातं होतं. जेव्हा निजामानं सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला, त्यावेळी सरदार पटेल यांनी निजामाला गुडघे टेकायला लावले होते,' असं मोदी म्हणाले. यावरुन त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. 'सरदार पटेल यांचं नाव घेताच काँगेसमधील एका कुटुंबांची झोप उडते. पटेल यांचं तिरस्कार करणं काँग्रेसच्या स्वभावातच आहे,' अशा शब्दांमध्ये मोदी काँग्रेसवर बरसले.