बुकानकेरे सिद्दालिंगप्पा येडियुरप्पा... बीएसवाय... वय वर्ष 75... तीनवेळा कर्नाटकचे मुख्यमंत्री.. येडियुरप्पा यांचं वय जरी 75 असलं तरी उत्साह एखाद्या पंचविशीतल्या तरुणाला लाजवणारा आहे. त्यामुळेच ‘हम करे सो कायदा’वृत्तीने चालणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी असो वा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा. दोघांनाही बी.एस.येडियुरप्पा या कर्नाटकातील राजकीय नेत्याची शक्ती माहिती असल्यानेच त्यांनी स्वत:चेच नियम बदलले. असं फक्त कर्नाटकमध्येच घडलं. देशात इतरत्र कुठेही नाही.येडियुरप्पांचे नाव तसे वादग्रस्तच. स्वत:चे राजकारण साधताना फार काही ते कोणाची सोय पाहत नाहीत. आपली भूमिका पुढे रेटून पुढे जात राहणे त्यांना आवडतं. तसेच जर त्यांची कोंडी केली जात आहे असे वाटले किंवा ते अडचणीत येऊ लागले, तर ते कसे वागतील त्याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. कर्नाटकच्या राजकारणात लिंगायत आणि वोकलिंगा या दोन जाती खूप प्रभावी. लिंगायत समाजाकडे २२४ पैकी १०० मतदारसंघाचे निकाल बदलण्याची शक्ती. येडियुरप्पा लिंगायत समाजाचे. हा समाज खरा काँग्रेसचा हक्काचा मतदार. पण १९८०च्या दरम्यान काँग्रेसच्या दिल्लीश्वरांनी त्यांना जी वागणूक दिली, त्यामुळे ते दुखावले गेले. आणि त्यांचा लिंगायत समाज काँग्रेसपासून दुरावला. नेमक्या त्याच काळात राजकीय क्षितिजावर चमकू लागलेल्या येडियुरप्पांनी त्याचा फायदा घेतला. ते लिंगायतांचे आपले नेते झाले. संपूर्ण समाज भाजपाशी बांधला गेला. मात्र मधल्या काळात घोटाळ्यांचे आरोप झालेल्या येडियुरप्पांना भाजपाने पायउतार करताच ते जसे पक्षापासून दुरावले तसाच लिंगायत समाजही. येडियुरप्पांच्या कर्नाटक जनता पक्षाचा पराभव झालाच पण भाजपालाही सत्ता गमवावी लागली. काँग्रेस सत्तेवर आली. २०१४च्या मोदीलाटेआधी ते पुन्हा भाजपात आले. ते परतले, स्वत: खासदार झाले आणि यशही भाजपाकडे परतले. येडियुरप्पांचा जन्म २७ फेब्रुवारी १९४३चा. मंड्या जिल्ह्यातील के.आर.पेट तालुक्यातील बुकनकेरे गावी ते जन्माला आले. संत सिद्दालिंगेश्वरा यांनी तुमकुरमध्ये येडियूर मंदिराची स्थापना केली होती. त्या मंदिराच्या नावातून त्यांचे नाव ठेवण्यात आले. कोठेतरी श्रद्धाळू लिंगायत समाजाशी जन्मापासूनच नाते जुळण्यास सुरुवात झाली असावी ती अशी. घरची परिस्थिती तशी बऱ्यापैकी. मंड्या महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर १९६५मध्ये समाज कल्याण खात्यात प्रथम श्रेणी कारकून म्हणून ते रुजू झाले. पण सरकारी नोकरीत मन काही रमले नसावे. ती सोडून ते विरभद्र शास्त्रींच्या शिकारीपुरा येथील शंकर राइस मिलमध्ये कारकून झाले. १९६७मध्ये मिलच्या मालकाची कन्या मिथ्रादेवीशी त्यांचे लग्न झाले. आधीपासूनच याच परिसरात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही जाळे विणले. १९७०मध्ये ते संघाचे नगर कार्यवाह झाले. दरम्यान जनसंघाच्या माध्यमातून त्यांचा याच परिसरात राजकारण प्रवेश झाला. पुढे भाजपापर्यंतचा प्रवासही. तसाच नगरसेवक पदापासून आमदार, खासदार, प्रदेशाध्यक्ष, विरोधीपक्ष नेते, मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीपदापर्यंतचं सत्तेच राजकारणही रंगले. शिकारीपुराने येडियुरप्पांना चांगलीच साथ दिली. सातत्याने ते तेथून आमदार म्हणून निवडून आले. अगदी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बंगारप्पा हे काँग्रेस, जनता दलाच्या संयुक्त पाठिंब्याने समाजवादी पार्टीतर्फे लढले, तेव्हा येडियुरप्पांनी त्यांना दणक्यात हरवले. अपवाद १९९९चा. पहिल्यांदाच ते पराभूत झाले. मात्र पक्षाला या जनाधार असलेल्या नेत्याची किंमत माहित असल्याने त्यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात आले. पुढील निवडणुकीत त्यांनी दमदार पुनरागमन केले. २००४मध्ये विरोधी पक्षनेते झाले. मधल्या काळात ४० महिन्यासाठी ठरलेल्या भाजपा- जनता दल तडजोड सरकारमध्ये कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले तेव्हा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाले. मात्र २० महिन्यांनंतर कुमारस्वामींना पदाचा मोह सोडवेना आणि त्यांनी पद सोडण्यास नकार दिला. येडियुरप्पांचे मुख्यमंत्रीपद हुकले.काही दिवसांनी जनता दलाला उपरती झाली. येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले. मात्र अवघ्या आठवड्यासाठीच. खातेवाटपावरून वाद घालत जनता दलाने सरकार पाडले. निवडणुका झाल्या. येडियुरप्पांनी झंझावाती प्रचार केला. ३० मे २००८ रोजी येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांचा बेधडक कारभार अंगाशी आला. आरोप झाले. बेकायदा खाण प्रकरण लोकायुक्तांकडे गेले. त्यांनी बंगळुरु, शिमोगा जमीन व्यवहारात येडियुरप्पांवर ठपका ठेवला. प्रचंड गदारोळ झाला. दिल्लीपर्यंत राजकारण झाले. अखेर ३१ जुलै २०११ रोजी त्यांना राजीनामा द्यावा लागला. सदानंद गौडा मुख्यमंत्री झाले. तेथून ते मनाने भाजपापासून दुरावले. त्यांनी ३० नोव्हेंबर २०१२ भाजपाला सोडचिठ्ठी देत कर्नाटक जनता पार्टीची वेगळी वाट निवडली. पण त्यांना आणि भाजपालाही फटका बसला. काँग्रेस सत्तेत आली. सिद्धारामय्या मुख्यमंत्री झाले. दरम्यानच्या काळात भाजपातही बदल सुरु झाले. नरेंद्र मोदींचे वारे वाहू लागले. २ जानेवारी २०१४ येडियुरप्पा स्वगृही परतले. कोणत्याही अटींविना. २०१४ मध्ये त्यांना तसेच त्यांच्या घनिष्ठ समर्थक शोभा करंदलाजे यांना उडुपी-चिकमगलुर मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. ते निवडूनही आले. २०१६मध्ये भाजपाने त्यांना प्रदेशाध्यक्षपद बहाल केले. परंपरा मोडत २०१८च्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणूनही जाहीर केले. त्यांनी जोमाने प्रचारही सुरु केला आणि तिसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्रीही झाले.
राइस मिलमधील कारकून... संघप्रचारक... भाजपा नेते ते मुख्यमंत्री.... येडियुरप्पांचा संघर्षमयी आणि वादग्रस्त प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 10:42 AM