'हे' आहेत कर्नाटकमधील सर्वात श्रीमंत आमदार, संपत्ती पाहून डोळे गरगरतील!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 12:15 PM2018-05-17T12:15:26+5:302018-05-17T12:15:26+5:30
कर्नाटक विधानसभेतील २२१ पैकी २१५, म्हणजेच ९७ टक्के आमदार कोट्यधीश आहेत.
बेंगळुरूः कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालात कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं आणि काँग्रेस-जेडीएसनं हातमिळवणी करून भाजपाची कोंडी केल्यानं सत्तास्थापनेसाठी घोडेबाजार होण्याची भीती व्यक्त होत आहे. राजकीय वर्तुळात बरीच आर्थिक गणितं मांडली जात असताना, कर्नाटकमधील आमदारांच्या संपत्तीचा आकडा समोर आलाय आणि तो डोकं गरगरून टाकणारा आहे.
कर्नाटक विधानसभेतील २२१ पैकी २१५, म्हणजेच ९७ टक्के आमदार कोट्यधीश आहेत. १५ आमदारांकडे १०० कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यात एक भाजपाचा, ३ जेडीएसचे आणि ११ काँग्रेसचे आमदार आहेत. सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत पहिले तीनही क्रमांक काँग्रेस आमदारांनी पटकावलेत. एम नागराजू यांच्याकडे तब्बल १०१५ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्या खालोखाल ८४० कोटींचे धनी असलेल्या डी के शिवकुमार यांचा नंबर लागतो. तिसऱ्या स्थानावर सुरेश बी. एस. असून त्यांच्याकडे ४१६ कोटींची संपत्ती आहे.
२०१३ मध्ये कर्नाटक विधानसभेतील ९३ टक्के आमदार करोडपती होते. २१८ आमदारांकडे सरासरी २३.५४ कोटी इतकी मालमत्ता होती, तर २०१८ मध्ये एकूण २२१ आमदारांकडे सरासरी ३४.५४ कोटी इतकी संपत्ती असल्याचं एडीआरने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. त्यांनी उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे हा अहवाल तयार केला आहे.
कर्नाटक विधानसभेतील सर्वात 'गरीब' आमदार भाजपाचा आहे. मैसूरमधील एस ए रामदास यांची संपत्ती ४० लाखांच्या आसपास आहे, तर जेडीएसचे ए एस रवींद्र यांच्याकडे ६८ लाखांची मालमत्ता आहे. बहुजन समाज पार्टीचे एकमेव आमदार एन महेश यांची संपत्ती ७५ लाखाहून थोडी अधिक आहे.