karnataka election results 2018: नरेंद्र मोदी- अमित शहांना येडियुरप्पांच्या शपथविधीला जाण्यापासून रोखणारं 'ते' ट्विट कोणाचं?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2018 11:47 AM2018-05-18T11:47:43+5:302018-05-18T11:56:01+5:30
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 104 जागा मिळविलेल्या भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा केला.
बंगळुरू- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 104 जागा मिळविलेल्या भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर गुरूवारी (ता. 18 मे) येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतली. पण येडियुरप्पा यांचा शपथविधी सोहळा काहीसा अधुरा दिसला. येडियुरप्पा यांच्या शपथविधी सोहळ्याला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी गैरहजर दिसले. मोदी व अमित शहा यांची शपथविधी सोहळ्याला गैरहजेरी सगळीकडे चर्चेचा विषय आहे.
कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी भाजपाला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं होतं. त्याचवेळी मोदी व शहा जर शपथविधी सोहळ्याला हजर राहिले असते, तर येडियुरप्पा यांचं मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं निश्चित होतं, असा संदेश गेला असता, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. पण येडियुरप्पा यांच्या शपथविधी सोहळ्याबद्दल कर्नाटक भाजपाने केलेल्या ट्विटमुळेही वाद निर्माण झाला. राज्यपालांकडून सत्ता स्थापनेसाठीचं निमंत्रण येण्यापूर्वीच कर्नाटक भाजपाने येडियुरप्पा शपथ घेणार असल्याचं ट्विटरवर जाहिर केलं.
कर्नाटक भाजपाच्या ट्विटमुळे वजुभाई वाला याचा कर्नाटकबद्दलचा निर्णय पूर्वनियोजीत होता, असा संदेश गेल्याची चर्चा आहे. कर्नाटक भाजपाने केलेलं ट्विट नंतर डिलीट केलं पण तोपर्यंत ट्विट सगळीकडे व्हायरल झालं होतं. दरम्यान, कर्नाटक विधानसभा मतदानाच्या आधीच येडियुरप्पा यांनी 17 मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचा दावा केला होता.