Karnataka Elections: ...तर भाजपा बहुमताचा आकडा गाठणार; 'या' आमदारांचा पाठिंबा मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 01:39 PM2018-05-17T13:39:25+5:302018-05-17T13:39:25+5:30

बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपाचा मास्टरप्लान

Karnataka Elections bjp seeks to win over congress and jds lingayat mlas to form government | Karnataka Elections: ...तर भाजपा बहुमताचा आकडा गाठणार; 'या' आमदारांचा पाठिंबा मिळणार

Karnataka Elections: ...तर भाजपा बहुमताचा आकडा गाठणार; 'या' आमदारांचा पाठिंबा मिळणार

googlenewsNext

बंगळुरू: कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी सत्ता स्थापन करण्याचं निमंत्रण देताच आज सकाळी भाजपाचे विधीमंडळातील नेते येडीयुरप्पा यांनी शपथ घेतली. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाला 15 दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे आता आमदारांची जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरू झाले आहेत. काँग्रेस आणि जेडीएसच्या लिंगायत आमदारांकडे भाजपाचं विशेष लक्ष आहे. काँग्रेस आणि जेडीएसच्या युतीमुळे दोन्ही पक्षांमधील लिंगायत समाजाचे आमदार नाराज आहेत. याच आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपानं प्रयत्न सुरू केले आहेत.
 
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र तो बहुमतापासून 8 जागा दूर आहे. त्यामुळे 78 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसनं थेट 37 जागा जिंकलेल्या जेडीएसला पाठिंबा दिला. काँग्रेस आणि जेडीएसनं एकत्र येत भाजपाला रोखण्याचा प्रयत्न केला. जेडीएसच्या कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री करुन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. मात्र वोकलिंगा समाजाच्या कुमारस्वामींना मुख्यमंत्रीपद देण्याचा मानस दोन्ही पक्षांमधील लिंगायत समाजाच्या आमदारांना पटलेला नाही. काँग्रेसमध्ये लिंगायत समाजाचे 21 आमदार आहेत. तर जेडीएसमध्ये असलेल्या लिंगायत समाजाच्या आमदारांची संख्या 10 इतकी आहे. याच आमदारांना गळाला लावण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. 

मुख्यमंत्री येडियुरप्पा लिंगायत समाजाचे राज्यातील मोठे नेते मानले जातात. त्यामुळे कुमारस्वामी यांच्या नेतृत्त्वावर नाराज असलेले काँग्रेस आणि जेडीएसमधील जवळभर डझनभर आमदार भाजपाला पाठिंबा देऊ शकतात. भाजपाचे 104 आमदार असल्यानं त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 8 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. काँग्रेस, जेडीएसच्या नाराज आमदारांचं समर्थन मिळवण्यात भाजपा यशस्वी झाल्यास त्यांना बहुमत सिद्ध करण्यात यश येऊ शकतं. असं घडल्यास भाजपासाठी ते मोठं यश असेल. मात्र काँग्रेस आणि जेडीएससाठी ती मोठी नामुष्की ठरेल.
 

Web Title: Karnataka Elections bjp seeks to win over congress and jds lingayat mlas to form government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.