Karnataka Elections: हद्द झाली राव... सकाळी भाजपाचं 'कमळ', दुपारी काँग्रेसचा 'हात', संध्याकाळ होताच बदलली साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 12:08 PM2018-05-17T12:08:22+5:302018-05-17T12:08:22+5:30
चोवीस तासांमध्ये तीनवेळा आमदारानं निष्ठा बदलली
बंगळुरु: कर्नाटक विधानसभेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं अपक्ष आमदारांसाठी भाजपा आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. या परिस्थितीमुळे अपक्ष आमदारांना प्रचंड 'भाव' मिळतो आहे. अपक्ष आमदार आर. शंकर यांनी तर 24 तासांमध्ये तीनवेळा त्यांच्या निष्ठा बदलल्या आहेत. बुधवारी सकाळी भाजपा नेत्यांसोबत दिसलेले शंकर सूर्य मावळताच काँग्रेससोबत गेले. रात्र होताच ते पुन्हा भाजपाकडे आले आणि आज सकाळी काँग्रेस नेत्यांसोबत भाजपाविरोधात विधानभवन परिसरात आंदोलन करताना दिसले.
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या आर. शंकर यांना काँग्रेसनं तिकीट नाकारलं. यानंतर त्यांना भाजपनं तिकीट देऊ केलं. मात्र ते नाकारत त्यांनी केपीजेपीकडून निवडणूक लढवली. शंकर यांनी रानेबेन्नूर मतदारसंघातून काँग्रेस नेते आणि तत्कालीन विधानसभेचे अध्यक्ष के. बी. कोलीवाड यांचा पराभव केला. तब्बल 260 कोटींची संपत्ती असलेल्या शंकर यांना सिद्धरामय्या यांचा पाठिंबा होता. त्यामुळेच सिद्धरामय्या यांनी आपल्यासाठी प्रचार केला नाही, असा आरोप कोलीवाड यांनी केला.
कोलीवाड यांचा पराभव करणारे शंकर काल सकाळी भाजपा नेते येडियुरप्पा यांच्यासोबत होते. त्यानंतर दिवस मावळताच ते काँग्रेस नेत्यांसोबत दिसले. रात्री त्यांनी भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. मात्र गुरुवारचा दिवस उजाडताच त्यांनी पुन्हा निष्ठा बदलली आणि काँग्रेस नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसत भाजपाविरोधात घोषणाबाजीदेखील केली.