बेंगलोर- कर्नाटक विधानसभेवर नेमकी कुणाची सत्ता येणार? हे आज 4 वाजता होणाऱ्या बहुमत चाचणीनंतर स्पष्ट होणार आहे. 104 आमदारांचं संख्याबळ असलेल्या भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा केला आणि येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण विधानसभेत सत्ता स्थापनेसाठी लागणारं 112 आमदारांचं संख्याबळ भाजपाकडे नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या आमदारांची जुळवाजुळव करण्याचं आव्हान भाजपासमोर आहे. अशातच काँग्रेसने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर गंभीर आरोप केली. भाजपाकडून कोट्यवधी रुपयांची लाच देण्याचे फोन आल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातो आहे. भाजपाचे नेते जनार्दन रेड्डी यांनी आमच्या आमदारांना फोन करून कोट्यवधी रुपयांची लाच देण्याचं आश्वासन दिल्याचा आरोप काँग्रेसने केला. या संदर्भातील एका ऑडिओ क्लिप काँग्रेसने पत्रकार परिषदेत जारी केली. भाजपाच्या समर्थनार्थ विधानसभेत मत द्या, असं भाजपाकडून सांगितलं जात असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.
काँग्रेसने जारी केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती कन्नड भाषेत बोलताना ऐकायला येतं आहे. 'आम्हाला सांगा तुम्हाला कुठलं पद हवं आहे. आपण समोरा-समोर बसवून ते ठरवू. तुम्ही एक मंत्री बनू शकता. मोठ्या लोकांबरोबर उठ-बस करण्याची संधी मी तुम्हाला देईल, याची खात्री देतो. ते त्यांचं वचन पूर्ण करतील. संपूर्ण देशावर ते राज्य करत आहे. आत्ता तुमची जितकी संपत्ती आहे त्याच्या 100 पटीने संपत्ती वाढवू शकता, असं या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. पण ही ऑडिओ क्लिप नेमकी कुणाची आहे? याबद्दलची माहिती समोर आली नाही. दरम्यान, भाजपाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ऑडिओ क्लिप बनावट असल्याचा दावा भाजपाने केला आहे.