बेंगळुरूः कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ आपल्याकडे नसल्याची जाणीव झाल्यानंतर मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी आज बहुमत चाचणीआधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कर्नाटकातील सत्तास्थापनेच्या नाटकावर अखेर पडदा पडलाय. त्यामुळे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे येडियुरप्पा अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरले. शेवटच्या श्वासापर्यंत कर्नाटकच्या विकासासाठी, शेतकरी-गरीब जनतेसाठी लढत राहीन, पुन्हा जनतेपुढे जाऊन विजय मिळवेन, अशा निर्धार व्यक्त करत त्यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली.
* येडियुरप्पा काय म्हणाले निरोपाच्या भाषणात?
>> भाजपाने मला कर्नाटकचं नेतृत्व करण्याची संधी दिल्यानंतर मी राज्यभरात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. जनतेचं प्रेम जिंकण्यात मी यशस्वी झालो. त्याबद्दल साडेसहा कोटी जनतेला नम्र वंदन करतो.
>> आमच्या प्रयत्नांना जनतेनं साथ दिली. या संपूर्ण लढ्यात ते पाठीशी उभे राहिले.
>> माझ्याकडे १०४ आमदार आहेत. राज्याच्या जनतेनं काँग्रेस-जेडीएसला नाकारलंय. जनादेश काँग्रेसलाही नाही, जेडीएसलाही नाही. ते एकमेकांवर आरोप करत राहिले, भांडत राहिले, दोष देत राहिले. त्यामुळे लोकांनी त्यांना त्यांचं स्थान दाखवून दिलं. दोन्ही पक्ष निवडणुकीत पराभूत झाले. भाजपा सगळ्यात मोठा पक्ष ठरला आणि राज्यपालांनी मला सरकार स्थापनेचं आमंत्रण दिलं.
>> शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा, त्यांच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याचा निर्णय मी घेतला. मी या सदनाद्वारे जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की, जिवंत असेपर्यंत अन्नदाता शेतकऱ्याला मदत करत राहीन.
>> आपण सगळे मिळून हे काम करू. हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांचे हाल होत आहेत. त्यामुळे आक्रोश करत जनतेनं आम्हाला कौल दिला.
>> पाच वर्षांत खूप चढ-उतार पाहिले. शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, सामान्य जनतेचे अश्रू पाहून त्यांना दिलासा देण्यासाठी धावून गेलो. साडेसहा कोटी जनतेला सन्मानाने जगता यावं यासाठी मी जीवन समर्पित करण्यास तयार आहे.
>> शेतकऱ्यांचं १ लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्याचा मी विचार केला होता. दीड लाख शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था देण्याची योजना होती. सहा नद्या जोडून पाण्याची समस्या दूर करण्याचा प्रयत्न होता. किमान आधारभूत किंमतही देणार होतो. >> रेल्वे योजना असो, राष्ट्रीय महामार्ग असो, जिथे पैशाची आवश्यकता भासली, मी प्रयत्न केला. पंतप्रधानही कधीच मागे हटले नाहीत.
>> आज माझी अग्निपरीक्षा आहे. संघर्ष माझ्यासाठी नवा नाही. अनेक लढाया मी लढलो.
>> जनतेनं ११३ जागा दिल्या असत्या तर राज्याची स्थितीच बदलली असती, आम्ही नंदनवन केलं असतं. लोकशाहीवर भाजपाचा पूर्ण विश्वास आहे.
>> मी राज्याच्या जनतेला आश्वासन देतो की जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत सगळीकडे जाईन, पुन्हा जिंकून येईन. निवडणुका कधी येतील माहीत नाही. पाच वर्षांनी होतील किंवा लगेचही होऊ शकतात. त्यावेळी १५० जागा जिंकण्याचा प्रयत्न असेल.
>> मी राज्याच्या जनतेचा आभारी आहे. मोठ्या संख्येनं त्यांनी मतं दिली. मी जनादेशाचा सन्मान करतो.
>> सर्वच आमदारांना मी अंतरात्म्याचा आवाज ऐकून मत देण्याचं आवाहन केलं होतं. पण त्यांनी सदस्यांना बंदिस्त करून ठेवलं. कुटुंबीयांपासून दूर ठेवलं. ते मला बघवत नव्हतं. अशा पद्धतीचं काम मी करूच शकत नाही.
>> सत्तेत असलो किंवा सरकारमध्ये नसलो तरी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन. लोकशाही मतदार हाच राजा असतो. त्यांचा निर्णय मला मान्य आहे. जे प्रेम त्यांनी दिलंय, ते विसरू शकत नाही.
>> लोकसभेच्या कर्नाटकातील २८ पैकी २८ जागा आम्ही जिंकू.
>> मी बहुमत चाचणीआधी राजीनामा देत आहे. राज्यापालांकडे जाऊन मी राजीनामा सोपवेन. पुन्हा जनतेपुढे जाऊन त्यांचा विश्वास जिंकेन.