Karnataka Floor Test: येडियुरप्पांचा राजीनामा; आता काय होणार कर्नाटकात?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 03:48 PM2018-05-19T15:48:56+5:302018-05-19T23:48:39+5:30
बहुमताच्या आकड्याची जुळवाजुळव न झाल्यानं येडियुरप्पांचा राजीनामा
बंगळुरु: बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ न गाठू शकल्यानं येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आमदारांची जुळवाजुळव न झाल्यानं बहुमत चाचणीला सामोरं जाण्याआधीच त्यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली. कर्नाटक विधानसभेत 221 आमदार असल्यानं मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना सरकार टिकवण्यासाठी 111 आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता. त्यामुळे भाजपाला आणखी 7 आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती. मात्र ही आमदारांची जुळवाजुळव होत नसल्यानं येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला.
येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेस आणि जेडीएस राज्यपाल वजुभाई वाला यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करतील. यानंतर राज्यपालांकडून काँग्रेस आणि जेडीएसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं जाईल. मात्र यासाठी राज्यपाल नेमका किती वेळ देतात, हे महत्त्वाचं आहे. राज्यपालांनी 104 जागा असलेल्या भाजपाला 15 दिवसांचा वेळ दिल्यानं काँग्रेस आणि जेडीएसनं थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. भाजपाकडून आमदार फोडले जाण्याची शक्यता असल्यानं काँग्रेस आणि जेडीएसचे नेते चिंतेत होते.
येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यामुळेर राज्यपाल काँग्रेस आणि जेडीएसला सत्ता स्थापनेसाठी वेळ देतील. हा कालावधी नेमका किती असेल, यावर बरंच काही अवलंबून असेल. हा कालावधी जास्त असल्यास 78 आमदार असलेल्या काँग्रेसला आणि 37 आमदार असलेल्या जेडीएसला फोडाफोडीची भीती असेल. हा कालावधी कमी असल्यास काँग्रेस आणि जेडीएसला फायदा होईल. त्यांना फोडाफोडी टाळता येईल आणि बहुमत सिद्ध करुन सत्ता स्थापन करता येईल.