बेंगळुरूः कर्नाटक विधानसभेत आम्ही 'शत-प्रतिशत' बहुमत सिद्ध करू, असा दावा करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा बहुमत चाचणीआधीच राजीनामा देतील, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय. बहुमताचा आकडा गाठण्यात आपण अपयशी ठरल्याची जाणीव झाल्यानंतर, बहुमत चाचणीत नापास होऊन नामुष्की ओढवून घेण्यापेक्षा आधीच राजीनामा देऊ, असं येडियुरप्पांनी भाजपाश्रेष्ठींना कळवल्याचं समजतं.
कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जाताच, येडियुरप्पा भाषणासाठी उभे राहतील आणि आपल्या राजीनाम्याची घोषणा करतील, असं सूत्रांनी सांगितलं. येडियुरप्पांनी १३ पानी भाषण तयार केलं आहे. त्यातून ते लिंगायत समाजाच्या मतदारांना आणि एकूणच कर्नाटकच्या जनतेला भावनिक साद घालतील, असं कळतं. या 'यू-टर्न'मुळे भाजपा नाकावर आपटेल, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल, हे नक्कीच. पण, भविष्यात सहानुभूती मिळवण्याच्या दृष्टीने, चाचणीआधीची ही माघार त्यांना फायदेशीर ठरू शकते, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
कर्नाटक विधानसभेत ११२ ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेत्यांनी जंग जंग पछाडलं. काँग्रेस-जेडीएस-बसपा एकत्र आल्यानं १०४ वरून ११२ पर्यंत मजल मारणं सोपं नव्हतं, पण त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले होते. काँग्रेस-जेडीएसच्या लिंगायत आमदारांवर त्यांची मदार होती. राज्यपालांनी १५ दिवसांची मुदत दिल्यानं ते तसे निर्धास्त होते. पण, अचानक सर्वोच्च न्यायालयाने त्यांना धक्का दिला आणि त्यांची सगळीच गणितं बिघडली.
तरीही, आज सकाळपर्यंत भाजपाची, येडियुरप्पांची मोर्चेबांधणी सुरूच होती. पण दुपारी शपथविधी झाल्यानंतर मात्र त्यांच्या आशा मावळल्या. येडियुरप्पांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट जाणवत होती. विधानसभेचं कामकाज साडेतीन वाजेपर्यंत स्थगित झालं, त्यानंतर सगळंच चित्र बदललं आणि भाजपाने माघार घेतल्याचे संकेत मिळाले.
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याचं कळतं. त्यात नेमकी काय चर्चा झाली हे कळू शकलेलं नाही. परंतु, बहुमत चाचणीआधीच येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, अशी चिन्हं आहेत.