बंगळुरु : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे अशा नागरिकांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी कर्नाटक सरकारने 1610 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. तसेच, लॉकडाऊनमुळे नुकसान झालेल्या न्हावी, ड्रायव्हर्स, धोबी आणि माळी यांना निधी देण्यात येणार असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सांगितले.
राज्यातील ड्रायव्हर्स आणि न्हावी यांना पाच-पाच हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केली आहे. राज्यात जवळपास 7,75,000 ड्रायव्हर्स आणि 2,30,000 न्हावी आहे. त्यांना या आर्थिक पॅकेजचा फायदा होईल, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सांगितले.
याशिवाय, राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या जवळपास एक लाख लोकांना 3500 बसेस आणि रेल्वेने त्यांच्या घरी परत पाठवले आहे, असे सांगत मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा म्हणाले, 'बांधकामाचे काम आता पुन्हा सुरू झाल्याने आम्ही स्थलांतरित मजुरांना कर्नाटकात थांबण्याचे आवाहन केले आहे.'
दरम्यान, बांधकाम व्यवासायिक आणि इतर औद्योगिक कामांना सुरु करण्याचा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी घेतला आहे. त्यामुळे मजुरांना आपल्या घरी जाण्यासाठी असलेल्या परतीच्या 'विशेष रेल्वे' त्यांनी रद्द करण्याचा निर्णयही घेतला आहे.