बंगळुरु: स्थापनेपासूनच अस्थिर असलेलं कर्नाटकमधीलकाँग्रेस-जेडीएसचं सरकार मोठ्या संकटात सापडलं आहे. काँग्रेस-जेडीएसच्या 14 आमदारांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिला आहे. हे आमदार राजीनामा सोपवण्यासाठी विधानसभेच्या अध्यक्षांकडे गेले होते. मात्र अध्यक्षांची भेट न झाल्यानं त्यांनी त्यांच्या सचिवांकडे राजीनामा सुपूर्द केला. चौदा आमदारांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिल्याच्या माहितीला विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी दुजोरा दिला. मुख्यमंत्री कुमारस्वामी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना कर्नाटकात सत्तेचं नाटक सुरू झालं आहे. त्यामुळे कुमारस्वामी उद्या अमेरिकेतून परतू शकतात. काँग्रेस, जेडीएसचे आणखी काही आमदार राजीनामा देतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे संकटमोचक डी. के. शिवकुमार त्यांच्या कनकपुरा विधानसभा क्षेत्रातून बंगळुरुत दाखल झाले. सरकार अडचणीत सापडल्यानं उपमुख्यमंत्री जी परमेश्वर आणि डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली. भाजपाकडून राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप डी. के. शिवकुमार यांनी केला. तर राज्यपालांनी सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिल्यास भाजपा बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास भाजपा नेते डी. व्ही. सदानंद गौडांनी व्यक्त केला. भाजपाच राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. काँग्रेस, जेडीएसमध्ये राहून जनहित साधता येणार नाही, हा विचार करुन आमदारांनी राजीनामे दिले असावेत, असंदेखील गौडा यांनी म्हटलं.