बंगळुरू - काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांनी राजीनामा देत मुंबईकडे कूच केल्याने कर्नाटकमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. आमदारांच्या राजीनामा नाट्यामुळे काँग्रेस-जेडीएसचे आघाडी सरकार संकटात आले असून, सरकार टिकवण्यासाठी एच.डी. कुमारस्वामी यांनी धावाधाव सुरू केली आहे. परिस्थिती सांभाळण्यासाठी कुमारस्वामी अमेरिकेहून तातडीने भारतात परतले आहेत. तसेच काँग्रेसकडूनही आपल्या असंतुष्ट आमदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. बंगळुरू येथे पोहोचल्यानंतर कुमारस्वामी हे पक्षाच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. तसेच आमदारांसोबतही चर्चा करतील. दरम्यान, काँग्रेसनेही आपल्या आमदारांच्या दलाची बैठक 9 जुलै रोजी बोलावली आहे. त्यासाठी पक्षाने एक सर्क्युलर प्रसिद्ध केले आहे. तसेच या बैठकीस उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच या बैठकीस अनुपस्थित राहणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. मंगळवारी होणाऱ्या बैठकीला माजी मुख्यमंत्री सिद्घारामय्या, कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव आणि कर्नाटकचे प्रभारी के.सी. वेणुगोपाल हे उपस्थित असतील. कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल (एस)च्या सत्ताधारी आघाडीतील 13 आमदारांनी शनिवारी राजीनामा दिल्याने आधीपासूनच डामाडौल अवस्थेत असलेले एच. डी. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळण्याची चिन्हे दिसत आहेत. या घडामोडींनी कर्नाटकचे राजकारण हातघाईवर आले असून, सरकार वाचविण्यासाठी आघाडीच्या नेत्यांनी तर संधी मिळताच सत्तेची खुर्ची बळकावण्यासाठी भाजपाचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत.कर्नाटकातलं सरकार अल्पमतात आलं असून, काँग्रेस आणि जेडीएसच्या आघाडीवरही संकट घोघावतंय. शनिवारी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. सर्व 10 आमदार मुंबईतल्या एका आलिशान हॉटेलमध्ये थांबले आहेत. काँग्रेस आणि जेडीएसनं या आमदारांशी संपर्क साधू नये, यासाठीही भाजपा प्रयत्नशील आहे. मुंबईत आलेल्या आमदारांमध्ये 7 काँग्रेसचे, तीन जेडीएसचे आहेत.