नवी दिल्ली: आयपीएलच्या धर्तीवर आता आमदारांचा लिलाव होईल, अशा शब्दांमध्ये भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी कर्नाटकमधील राजकीय परिस्थितीवरुन भाजपावर शरसंधान साधलं. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी बहुमत नसतानाही भाजपाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिल्यानं सिन्हा यांनी जोरदार टीका केली. 'राज्यपालांच्या निर्णयामुळे आता आयपीएलच्या धर्तीवर आमदारांचा लिलाव होईल, त्यांच्यासाठी बोली लागेल,' असं सिन्हा यांनी म्हटलं. 'भाजपाकडे सत्ता स्थापनेसाठी बहुमत नाही. त्यांना आठ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत भाजपा बहुमत कसं काय सिद्ध करणार? दुसऱ्या पक्षातील काही आमदार फोडूनच त्यांना बहुमत सिद्ध करावं लागले,' असं सिन्हा यांनी म्हटलं. राष्ट्रीय मंचाकडून 'घटना बचाव' आंदोलन सुरू असताना ते बोलत होते. भाजपाला सत्ता स्थापन करण्याचं निमंत्रण देणाऱ्या राज्यपाल वजुभाई वाला यांच्या भूमिकेबद्दल त्यांनी संशय व्यक्त केला. राज्यपाल एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यासारखे वागू लागले, तर लोकशाही कशी चालणार?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी यशवंत सिन्हा यांनी भाजपावर शरसंधान साधलं होतं. 'भाजपा बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यास त्यांच्याकडून निर्लज्जपणे लोकशाही उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न होतील,' असं भाकीत त्यांनी वर्तवलं होतं. मी पक्षाला सोडचिठ्ठी दिली, याबद्दल अतिशय समाधान वाटतं, असंही ते म्हणाले. 'लोकशाहीलाच धक्का देऊ पाहणारा पक्ष मी सोडला, याचा मला खूप आनंद आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीत बहुमत न मिळाल्यास त्यावेळीही भाजपा हेच उद्योग करेल,' असा इशाराही त्यांनी दिला.
'आता आयपीएलप्रमाणे कर्नाटकमधील आमदारांसाठी बोली लागणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2018 7:46 AM