कर्नाटकचा फॉर्म्युला भाजपाला 'या' चार राज्यांमध्ये भोवणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 07:47 PM2018-05-17T19:47:08+5:302018-05-17T19:47:08+5:30
भाजपा आणि मित्रपक्षांच्या चार राज्यांमधील सत्तेला धोका निर्माण झाला आहे.
मुंबई - सर्वात जास्त आमदार असलेल्या पक्षाला सरकारस्थापनेसाठी पाचारण करण्याचे कर्नाटकातील राज्यपाल वजुभाई वाला यांचे धोरण भाजपला तेथे सत्तादायी ठरले आहे. मात्र तेथे फायद्याचे ठरलेले धोरण आता देशातील तीन राज्यांमध्ये भोवण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या राज्यपालांनी जे केले तुम्हीही करा, त्याच न्यायाने राज्याच्या विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्ता स्थापन करण्याची संधी द्या, अशी मागणी गोवा, बिहार, मणिपूर, मेघालय या चार राज्यांमधील विरोधी पक्षांनी तेथील राज्यपालांकडे केली आहे. त्यामुळे भाजपा आणि मित्रपक्षांच्या चार राज्यांमधील सत्तेला धोका निर्माण झाला आहे.
बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्या पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी २४३ सदस्यांच्या विधानसभेत ८० आमदार असल्याने आपल्याला सत्तास्थापनेची संधी मिळावी अशी मागणी केली आहे. काँग्रेसच्या सहकार्याने तेथे बहुमत सिद्ध करण्याचा दावा त्यांनी केला आहे. राज्यपालांनी शुक्रवारी दुपारी एक वाजता त्यांना भेटीसाठी वेळ दिली आहे. सध्या तेथे भाजपाच्या पाठिंब्यावर नितिशकुमार यांच्या जनता दल (संयुक्त)चे सरकार आहे.
गोव्यात तर काँग्रेसच्या तोंडाशी असलेला घास भाजपाने हिरावून घेतला होता. काँग्रेसच्या गोव्याच्या प्रभारी चेल्लाकुमार शुक्रवारी त्या राज्यात पोहचत असून राज्यपालांकडे सरकार स्थापनेसाठी संधी देण्याची मागणी करणार आहेत.
मणिपूरमध्येही अशीच राजकीय हालचाल सुरु झाली आहे. माजी मुख्यमंत्री ओक्राम इबोबी सिंह यांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेची मागणी केली आहे. मेघालयमध्येही माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांनीही अशीच मागणी केल्याने भाजपाचा सहभाग असलेल्या तेथील सरकारसमोर नवी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.