कर्नाटकमधील माजी मंत्री आणि खाण व्यावसायिक जी. जनार्दन रेड्डी लोकसभा निवडणुकीपूर्वी आज पुन्हा भाजपामध्ये दाखल झाले आहेत. रेड्डी यांनी गतवर्षी भाजपासोबतचं असलेलं २० वर्षांचं नातं तोडून कल्याण राज्य प्रगती पक्ष या पक्षाची स्थापना केली होती. जी. जनार्दन रेड्डी हे बेकायदेशीर खाणकाम प्रकरणातील आरोपी आहेत. तसेच ते कर्नाटकमधील गंगवती विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
जी. जनार्दन रेड्डी यांनी त्यांच्या केआरपीपी या पक्षाचं भाजपामध्ये विलिनीकरण केलं आहे. जनार्दन रेड्डी यांनी पत्नी अरुणा लक्ष्मी आणि कुटुंबातील काही सदस्यांसह भाजपाचे ज्येष्ठ नेते बी.एस. येडियुरप्पा, प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आणि इतरांच्या उपस्थित भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर जनार्दन रेड्डी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी मी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. ‘मी माझ्या घरी परत आलो आहे. आता पक्ष माझ्यावर जी काही जबाबदारी सोपवेल, ती मी पार पाडेन. मी सर्वांसाठी प्रचार करेन’. दरम्यान, जी. जनार्दन रेड्डी यांनी हल्लीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भेट घेतली होती. त्याआधी हल्लीच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता.
याच जी. जनार्दन रेड्डी यांच्यावर खाण घोटाळ्या प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणातील त्यांच्या भूमिकेवरून सीबीआयने त्यांना अटक केली होती. तेव्हापासून गतवर्षी विधानसभा निवडणुकीपर्यंत ते राजकीयदृष्ट्या निष्क्रिय होते. २०१८ च्या कर्नाटक विधनसभा निवडणुकीपूर्वी रेड्डी यांनी त्यांचे जवळचे मित्र बी. श्रीरामुलू यांच्यासाठी प्रचार केला होता. त्यावेळी भाजपाचे तेव्हाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भाजपाचा जनार्दन रेड्डी यांच्याशी काही संबंध नसल्याचे सांगितले होते.