अहमदाबाद - राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र सिंह कालवी 'पद्मावत' सिनेमा पाहण्याच्या आपल्या वक्तव्यावरुन यू-टर्न घेतल्याचे पाहायला मिळत आहे. संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमा पाहण्यासंदर्भात पत्र मिळालं आहे, असे कालवी यांनी सोमवारी (22 जानेवारी) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर सांगितले होते.
'पद्मावत' सिनेमा पाहण्यासाठी तयार आहे, मात्र भन्साळी यांनी अद्यापपर्यंत सिनेमा दाखवण्यासंदर्भातील तारीख कळवलेली नाही, असे कालवी यांनी सांगितले होते. पण मंगळवारी कालवी यांनी आपल्या विधानापासून यू-टर्न घेत सिनेमा पाहण्यास स्पष्ट नकार दिला आहे. हार्दिक पटेलनंदेखील पद्मावत सिनेमाच्या वादात उडी घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलनं गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना पत्र लिहून पद्मावतच्या रिलीजवर बंदी आणण्याची मागणी केली आहे.
कालवी यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितले की, भन्साळी ग्रुपमधून मला पत्र आले होते, मात्र ही एक फसवणूक होती. आम्ही सिनेमा पाहण्यास नकार द्यावा, अशीच त्यांची इच्छा होती. भन्साळींना आम्हाला सिनेमा दाखवायचाच नाहीय. सेन्सॉर बोर्डानंही सहा नाही तर केवळ तीन जणांनाच सिनेमा दाखवला आहे. दरम्यान, पद्मावत सिनेमा रिलीज करण्यात आला तर भन्साळींना परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी कालवी यांनी दिली आहे.
तर दुसरीकडे राजपूत संघटनांनंतर आता राजस्थानमध्ये हिंदुवादी संघटनांनीदेखील पद्मावतविरोधात निदर्शनं करण्यास सुरुवात केली आहे. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनीदेखील पद्मावत सिनेमाला विरोध दर्शवला आहे. कोणत्याही परिस्थिती सिनेमा रिलीज होऊ देणार नाही, असे तोगडिया म्हणालेत.
या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्यासाठी केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाच्या आदेशाविरोधात अध्यादेश आणण्याची मागणी तोगडिया यांनी केली आहे. सेन्सॉर बोर्ड आणि सुप्रीम कोर्टाकडून पद्मावत सिनेमाला हिरवा कंदील मिळालेला असतानाही काही संघटनांकडून अद्यापही तीव्र विरोध सुरूच आहे. या सिनेमामध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण राणी पद्मावतीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रणवीर सिंह आणि शाहिद कपूर यांचीदेखील सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. 25 जानेवारीला पद्मावत बॉक्सऑफिसवर रिलीज होणार आहे.