चेन्नई : मुथुवेल करुणानिधी यांनी मुख्यमंत्री या नात्याने तामिळनाडू राज्याची धुरा पाच वेळा सांभाळली आहे. सलग 50 वर्षे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. करुणानिधी यांचा आमदार ते मुख्यमंत्री हा प्रवास थक्क करायला लावणारा आहे.
1) स्वातंत्र्यानंतर द्राविडार कळघम पक्षामध्ये फूट पडली. करुणानिधी यांनी त्यांचे राजकीय गुरू अण्णादुराई यांच्याबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला. 1949 साली अण्णादुराई यांच्याबरोबर त्यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाची स्थापना केली आणि ते त्या पक्षाचे पहिले कोशाध्यक्ष झाले.
2) 1957 साली द्रमुकने तामिळनाडू विधानसभेची पहिली निवडणूक लढवली आणि पक्षाचे 13 सदस्य विधानसभेत निवडून गेले. त्यामध्ये करुणानिधी यांचा समावेश होते. ते कुलीतलाईमधून मतदारसंघातून निवडणूक लढले होते.
3) त्यानंतर त्यांनी 12 वेळा विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते नेहमीच विजयी होत राहिले. तामिळनाडूचे पाचवेळा मुख्यमंत्री झाले.
4) 1967 साली अण्णादुराई तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्यानंतर करुणानिधी यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आणि ते सार्वजनिक बांधकाम आणि महामार्ग खात्याचे मंत्री झाले व त्यांना कॅबिनेटमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले.
5) 1969 साली अण्णादुराई यांचे निधन झाल्यानंतर ते द्रमुक पक्षाचे अध्यक्ष झाले आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. 1971 साली त्यांच्या पक्षाला मोठे यश मिळाले.
6) 1977 साली एम. जी. रामचंद्रन म्हणजे एमजीआर त्यांच्या पक्षातून बाहेर पडले व अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम हा पक्ष सत्तेत आला. 1987 पर्यंत एमजीआर सत्तेत राहिले.
7) 1987 साली एमजीआर यांचे निधन झाल्यावर दोन वर्षांमध्येच करुणानिधी पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले.
1989 साली लोकसभा निवडणुकांमध्ये फारसे यश मिळाले नसले तरी केंद्रामध्ये व्ही. पी. सिंग यांच्या राष्ट्रीय आघाडी सरकारमध्ये करुणानिधी यांनी आपले भाचे मुरासोली मारन यांना स्थान मिळवून दिले.
8) 1999 साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्येही त्यांचा पक्ष सहभागी झाला. 2004 पर्यंत ते भारतीय जनता पार्टीबरोबर आघाडी सरकारमध्ये राहिले.
9) 2004 साली करुणानिधी यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करत संपुआ सरकारमध्येही स्थान मिळवले. 2014 साली त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणूकांमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. 2016 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जयललिता यांचा अण्णाद्रमुक पक्ष विजयी झाला. सध्या त्यांचा पक्ष तामिळनाडू विधानसभेत सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे.
10) आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत करुणानिधींनी कुलीतलाई, तंजावर, सैदापेट, अण्णानगर, हार्बर, चेपॉक, तिरुवरुर मतदारसंघातून निवडणूक लढवली.