सज्जन जिंदाल यांनी घेतला काशीचा हरिश्चंद्र घाट दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 02:23 AM2017-09-25T02:23:54+5:302017-09-25T02:23:58+5:30
उद्योगपती सज्जन जिंदाल यांनी वाराणसी (काशी) येथील प्रसिद्ध हरिश्चंद्र घाटाच्या नूतनीकरणाची आणि दुरुस्तीची जबाबदारी घेत हा घाट दत्तक घेतला आहे.
वाराणसी : उद्योगपती सज्जन जिंदाल यांनी वाराणसी (काशी) येथील प्रसिद्ध हरिश्चंद्र घाटाच्या नूतनीकरणाची आणि दुरुस्तीची जबाबदारी घेत हा घाट दत्तक घेतला आहे. तब्बल ३.५ कोटी रुपये खर्च करुन या घाटाचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात हा घाट आहे. एखाद्या धार्मिक घाटाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पुढाकार घेणारे जिंदाल हे पहिलेच उद्योगपती आहेत.
गंगा नदीच्या किनाºयावर हिंदू लोक अंत्यसंस्कार करतात.
याच ठिकाणी आता कोट्यवधी रुपये खर्च करुन स्वच्छता, नूतनीकरण आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी जिंदल स्टिल वर्कने (जेएसडब्ल्यू) केंद्र सरकारची परवानगी घेतली आहे.
३ आॅक्टोबरपासून सुरुवात
हे काम ३ आॅक्टोबरपासून सुरु होणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्थापित केलेल्या समितीशी विचारविमर्श केल्यानंतर या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी वार्षिक ३.५ कोटी रुपयांचा खर्र्च अपेक्षित आहे.
हरिश्चंद्र घाट आहे प्रसिद्ध
अंत्यसंस्कारासाठी वाराणसीतील मणिकर्णिका घाट आणि हरिश्चंद्र घाट प्रसिद्ध आहेत. हरिश्चंद्र घाटावर दिवस-रात्र विधी होतात. येथे विद्युत शवदाहिनी आहे. पण, त्याचा फारच थोडा वापर होतो. बहुतांश जण लाकडांचा वापर करतात.
काय होणार बदल?
या घाटावर दगडी बांधकाम करण्यात येणार असून, अंत्यसंस्कारासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या घाटावरून निघणाºया धुराबाबत कंपनी तपासणी करणार आहे. सांडपाणी आणि पूजेचे साहित्य यांचा नदीतील प्रवाह रोखण्यात येणार आहे. जेणेकरून येथील प्रदूषण कमी होईल. अंत्यसंस्काराचे विधी करण्यासाठी घाटावर कुंड तयार करण्यात येणार आहेत. घाटावरील भिंतींची पुनर्रचना करण्यात येणार आहे. सद्याच्या भिंतीतील तडे भरून काढण्यात येणार आहेत. घाटावरील विजेचे खांब पुन्हा उभारण्यात येणार आहेत. या संपूर्ण कामासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.