श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात पैसे देऊन लष्कराच्या जवानांवर दगडफेक करवून घेण्यात येत असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. लष्करावर होणाऱ्या दगडफेकी संदर्भात आता एक धक्कादायक गौप्यस्फोट झाला आहे. उत्त्तर प्रदेशातून नोकरीचे आमिष दाखवून काश्मीरमध्ये नेण्यात आलेल्या तरुणांना दगडफेक करण्याच्या कामास जुंपल्याचे समोर आले आहे. इंग्रजी वृत्तवाहिनी टाइम्स नाऊने हे वृत्त प्रसारित केले आहे. बागपत आणि सहारनपूर येथून काश्मीरमध्ये नेण्यात आलेल्या युवकांनी याबाबतचा धक्कादायक अनुभव कथन केला आहे. या युवाकंना काश्मीरमधील पुलवामा येथे दरमहा 20 हजार रुपये पगारावर टेलरची नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले. मात्र नंतर त्यांना दगडफेकीचे प्रशिक्षण घेण्यास भाग पाडले. जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचल्यावर आम्हाला नोकरी देण्याऐवजी लष्करावर दगडफेक करण्याच्या कामास जुंपण्यात आले. दरम्यान, जीव वाचवायचा असेल तर काश्मीर खोऱ्यातून पळून जा, असा सल्ला एका तरुणाने आपणास दिल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीचे दोन ते तीन महिने मी टेलरचे काम केले. मात्र या नोकरीबाबत मी चिंतीत होतो. मी परत जाण्यासाठी परवानगी मागितली. तेव्हा मला परवानगी नाकारण्यात आली. तसेच आम्हाला चोरीच्या आरोपामध्ये फरवण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासास सुरुवात केली आहे. गरज पडल्यास या प्रकरणामध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे.
नोकरीच्या आमिषाने नेले आणि दगडफेकीस जुंपले, तरुणांनी सांगितली आपबीती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 2:42 PM