दहशतवादी संघटनेत सामील झालेल्या काश्मिरी फुटबॉलपटूची 'घरवापसी', लोकांनी केलेल्या आवाहनानंतर परतला घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 02:12 PM2017-11-17T14:12:40+5:302017-11-17T14:17:27+5:30
जम्मू काश्मीरमध्ये सात दिवसांपुर्वी एक तरुण फुटबॉलपटू पाकिस्तानधील दहशवादी संघटना लष्कर-ए-तोयबात सामील झाला होता. मात्र लोकांनी केलेल्या आवाहनानंतर सातच दिवसात त्याने दहशतवादाला किक मारली असून, घरी परतला आहे.
श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये सात दिवसांपुर्वी एक तरुण फुटबॉलपटू पाकिस्तानधील दहशवादी संघटना लष्कर-ए-तोयबात सामील झाला होता. मात्र लोकांनी केलेल्या आवाहनानंतर सातच दिवसात त्याने दहशतवादाला किक मारली असून, घरी परतला आहे. सध्या तरुण पोलिसांच्या ताब्यात असून, त्याची चौकशी केली जात आहे. 10 नोव्हेंबर रोजी अनंतनाग येथे राहणारा माजिद इरशाद दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. त्याने थेट फेसबुकच्या माध्यमातूनच हे जाहीर केलं होतं. त्याने फेसबुवर एक फोटोही अपलोड केला होता, ज्यामध्ये त्याच्या हातात एके-47 दिसत होती.
माजिद इरशाद तेथील एक प्रसिद्ध फुटबॉलपटू आहे. 20 वर्षीय फुटबॉलपटू माजिद इरशाद खान ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. त्याच्या या निर्णयामुळे कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांना मोठा धक्का बसला होता. माजिद इरशाद एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या मित्रांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
ट्विटरवर एका वरिष्ठ पोलीस अधिक-याने माजिद इरशाद घरी परतल्याची माहिती दिली. त्यांनी लिहिलं की, 'माजिद इरशाद घरी परतला आहे. हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. त्याच्या आईने केलेल्या प्रार्थनेचं फळ आहे. ज्या तरुणांनी शस्त्र हाती घेतलं आहे, त्यांना आपल्या घरी परत यावं अशी विनंती आहे'. पोलिसांनी सांगितलं आहे की, 'माजिद इरशाद लष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. तो काही दहशतवाद्यांना ओळखतही होता. तो अनंतनाग डिग्री कॉलेजात कॉमर्सचा विद्यार्थी होता'.
मित्राच्या मृत्यूनंतर माजिद इरशाद दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. माजिद इरशादच्या मित्रांनी सांगितल्यानुसार, 'त्याचा जवळचा मित्र यावर निसार ऑगस्ट महिन्यात सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला होता. यानंतर माजिदला एकटेपणा भासू लागला होता. आपल्या मित्राच्या अंत्यसंस्कारालाही तो गेला होता. त्यानंतर तो पुर्णपणे बदलला'.
माजिद इरशाद दहशतवादी संघटनेत सामील झाल्यानंतर त्याचे नातेवाईक आणि मित्र घरी परत येण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून विनंती करत होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, माजिद इरशाद दहशतवादी संघटनेत सामील झाल्याने कुटुंबियांना मानसिक धक्का बसला होता. त्याच्या आईचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामध्ये त्या आर्त साद घालत मुलाला परत येण्याचं आवाहन करताना दिसत होत्या.
अखेर माजिद इरशादने स्वत:च दक्षिण काश्मीरचे पोलिस उपमहानिरीक्षकांसमोर आत्मसमर्पण केलं असल्याने कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.