अडीच वर्षांपासून पेन्शन बंद, आई जिवंत असल्याचं सिद्ध करण्यासाठी दिव्यांग मुलाची धडपड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 08:13 PM2024-12-11T20:13:26+5:302024-12-11T20:14:08+5:30
अधिकाऱ्यांनी एका वृद्ध महिलेला कागदावर मृत दाखवून तिची पेन्शन बंद केली. हा प्रकार महिलेला समजताच तिने कार्यालयात धाव घेतली. पण तोडगा निघाला नाही.
उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी एका वृद्ध महिलेला कागदावर मृत दाखवून तिची पेन्शन बंद केली. हा प्रकार महिलेला समजताच तिने कार्यालयात धाव घेतली. पण तोडगा निघाला नाही. आपण जिवंत असल्याचं दाखवण्यासाठी वृद्ध महिला गेल्या अडीच वर्षांपासून अधिकाऱ्यांच्या कार्यालयात चकरा मारत होती, मात्र तिचं कोणीच ऐकलं नसल्याचं सांगण्यात येत आहे.
हे संपूर्ण प्रकरण कौशांबीच्या मंझनपूर तहसीलमधील कटिपार गावातील आहे, जिथे ७० वर्षीय राजकुमारी देवी यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांच्यावर संकटांचा डोंगर कोसळला होता. त्यांच्या घरी एक दिव्यांग मुलगाही आहे. राजकुमारी देवी यांना कागदोपत्री मृत दाखवून अधिकाऱ्यांनी वृद्धापकाळ पेन्शन बंद केल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणाच्या चौकशीनंतर कठोर कारवाई करण्याचे आदेश डीएमने दिले आहेत.
आता राजकुमारी या स्वत:ला जिवंत असल्याचं सिद्ध करण्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून विकास भवनाच्या फेऱ्या मारत आहे. उन्हाळा असो किंवा हिवाळा, राजकुमारी आपल्या दिव्यांग मुलासह त्याच्या ट्रायसायकलवरून अधिकाऱ्यांकडे येतात आणि तक्रार नोंदवतात. जिल्ह्यातील उच्चपदस्थांच्या कार्यालयात जाऊनही कोणीच ऐकत नसल्याचं महिलेचं म्हणणं आहे
पेन्शन बंद झाल्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती आणखी खालावली आहे. मात्र एकही अधिकारी दखल घेत नाही. त्याचवेळी त्यांचा दिव्यांग मुलगा राम बहादूर सांगतो की, माझ्या आईला पेन्शन मिळायची, त्यामुळे घरखर्च भागत असे. अडीच वर्षांपासून माझ्या आईला समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कागदावर मृत दाखवलं, त्यानंतर मी माझ्या आईला ट्रायसायकलवर घेऊन ३० किलोमीटर अंतरावरील अधिकाऱ्यांकडे आलो, पण कोणीही ऐकत नाही.