केसीआर यांची मोदींशी तेलंगणाच्या प्रश्नांवर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 05:41 AM2018-12-27T05:41:33+5:302018-12-27T05:42:39+5:30
कालेश्वरम सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा देण्यासह अनेक प्रलंबित प्रश्नांवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन बुधवारी चर्चा केली.
नवी दिल्ली : कालेश्वरम सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा देण्यासह अनेक प्रलंबित प्रश्नांवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन बुधवारी चर्चा केली.
तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीने विजय मिळविल्यानंतर त्या पक्षाचे प्रमुख केसीआर पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्या घटनेनंतर ते व मोदी यांची ही पहिलीच भेट होती.
राज्यातील विजयानंतर केसीआर यांनी भाजपा, काँग्रेस यांच्यावर आणखी तिखट टीका करण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही पक्षांना वगळून देशातील प्रादेशिक पक्षांची आघाडी स्थापन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्याकरिता विविध नेत्यांशी चर्चा करण्यासाठी केसीआर सध्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची त्यांनी गेल्या दोन दिवसांत भेट घेतली.
विनंती मान्य
राव यांनी बुधवारी पंतप्रधानांची भेट घेऊन सुमारे एक तास चर्चा केली. प्रलंबित मागण्या लवकर मार्गी लावण्याची केसीआर यांनी केलेली विनंती मोदी यांनी मान्य केली आहे.