- धनाजी कांबळेहैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे; पण प्रचार सभांमध्ये सर्वसामान्य लोक यंदा नेत्यांना सवाल विचारू लागले आहेत. येथील टीआरएस सरकारविरोधात असलेला असंतोषही लोकांमधून व्यक्त करताना दिसत आहे. कागज नगरमध्ये प्रचार फेरीतील सभेच्या वेळी एका मतदाराने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना मुस्लिमांना आरक्षण कधी देणार, असा सवाल केला आणि तो ऐकून मुख्यमंत्र्यांचा पाराच चढला.अचानक आलेल्या प्रश्नामुळे काहीशा गोंधळलेल्या केसीआर यांनी अन्य लोकांसमोरच त्या तरुण मतदाराचा बाप काढला. एरव्ही शांत दिसणाऱ्या केसीआर यांचा हा अवतार पाहून प्रचारफेरीतील कार्यकर्तेही आवाक झाले होते. चुपचाप बस, हा तमाशा बंद कर, असे त्यांनी त्या तरुण मतदाराला ऐकवले. त्यावर माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या, असे तो म्हणाला. त्यामुळे आणखी चिडलेल्या के. चंद्रेशखर राव यांनी असे आरक्षण लगेच मिळते की काय?, गप्प बस, तुझ्या बापाशी बोलू की काय?, असे त्याला सुनावले. तोपर्यंत टीआरएसच्या कार्यकर्त्यांनी त्याला बाजूला खेचले, तर सभेला आलेल्या अन्य लोकांनीही त्याला शांत केले. त्यानंतर केसीआर यांचे भाषण पुन्हा सुरू झाले. मात्र त्यांच्या या भाषेमुळे सर्वांनाच धक्का बसला.वास्तविक तेलंगणा राष्ट्र समितीने मुस्लिमांना १२ टक्के आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, आजही नोकरी आणि शिक्षणामध्ये मुस्लिमांसाठी राखीव जागा ठेवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे केसीआर सरकार फसवणूक करीत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे दलित, आदिवासी, मुस्लीम समाजाबरोबरच विद्यार्थी, शेतकरी, महिलांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे केसीआर यांनी भाषणात वारंवार सांगितले. पण ही आश्वासने पोकळ ठरल्याने लोकांचा त्यांच्यावर राग आहे. त्याच मुस्लिमांना १२ टक्के आरक्षणाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून त्याची कधी अंमलबजावणी करणार, असा सवाल या तरुण मतदाराने विचारल्याने ते संतापले होते.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना हा प्रकार म्हणजे विरोधकांची खेळी असल्याचे केसीआर म्हणाले. एखाद्या कार्यकर्त्यांला विरोधक दारू पाजून असे अडचणीचे प्रश्न विचारायला भाग पाडतात, असेही ते म्हणाले. मात्र त्या तरुणाचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. अनावधानाने मी ते बोलून गेलो. त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही चंद्रशेखर राव यावेळी म्हणाले.>काँग्रेसची टीकापण या प्रकारामुळे चंद्रेशखर राव यांची वर्तणूक आणि स्वभाव यांवर टीका करण्याची संधीच काँग्रेसला मिळाली. राव हे नवाबासारखे वागतात, त्यांना लोकांनी प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. प्रश्न विचारताच, त्यांचा ते अपमान करतात; पण ही लोकशाही आहे, राजेशाही वा हुकूमशाही नाही, हे राव यांनी लक्षात ठेवावे. अर्थात, त्यांना थोड्याच दिवसांत ते कळेलच, असे काँग्रेसने म्हटले आहे.
मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न विचारताच केसीआर यांनी काढला तरुणाचा बाप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2018 4:57 AM