विकास झाडे -
नवी दिल्ली : दिल्लीत तीन महिन्यात संपूर्ण लसीकरण करण्याचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संकल्प केला आहे. परंतु याला केंद्र सरकार अडसर ठरत आहे. दिल्लीने मागविलेल्या १ कोटी ३४ लाख लसी आम्ही देणार नाही, असे केंद्राने स्पष्टपणे सांगितले.दिल्लीला ऑक्सिजन मिळावा म्हणून दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत केंद्राला ताकीद दिली. त्यानंतरच दिल्लीत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाला आहे. परंतु तोपर्यंत अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. राज्य सरकारे थेट कंपन्यांकडे मागणी करू शकतात, असे केंद्राने सुचविल्यानंतर केजरीवाल यांनी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनकडे १ कोटी ३४ लाख लसींची मागणी केली.या कंपन्यांनी दिल्ली सरकारला उत्तर दिले नाही. परंतु केंद्र सरकारने दिल्ली सरकारला पत्र पाठविले आणि तुम्ही मागणी केल्याप्रमाणे लस उपलब्ध होऊ शकत नाही. मे महिन्यात केवळ ३ लाख ५९ हजार लसी उपलब्ध होतील, त्यात कोविशिल्ड २ लाख ६७ हजार आणि कोवॅक्सिन ९२ हजार ८४० उपलब्ध होतील, असे कळविले आहे. केजरीवाल यांनी केलेल्या नियोजनानुसार दिल्लीला दररोज ३ लाख लसींची गरज आहे. लसींचा साठा आता संपत आला आहे.