कोरोना संकटाचा नीडरपणे मुकाबला करून त्याला नामोहरम करण्याची किमया केरळने करून दाखवली आहे. ही लढाई अजून पूर्णपणे संपली नसली, तरी हळूहळू व्यवहार सुरू व्हायला लागलेत, जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलंय. या शुभसंकेतांच्या पार्श्वभूमीवरच, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या घरी लेकीचा विवाहसोहळा पार पडणार आहे. विजयन यांची कन्या वीणा टी यांनी राजकीय नेत्याशी लगीनगाठ बांधायचं ठरवलंय आणि 15 जूनला साधेपणाने हे लग्न होणार आहे.
डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात DYFI चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य समितीचे सदस्य पीए मुहम्मद रियास हे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे जावई होणार आहेत. मुहम्मद रियास आणि वीणा टी हे एकमेकांना बरीच वर्षं ओळखतात. या ओळखीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं आणि आता ते लग्नबंधनात बांधले जाणार आहेत.
44 वर्षीय मुहम्मद रियास आणि 40 वर्षीय वीणा या दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. रियास पहिल्या पत्नीपासून 2015 साली वेगळे झाले. त्यांना दोन मुलं आहेत. तर, वीणा यांनाही एक मुलगा आहे.
मुहम्मद रियास हे माजी आयपीएस अधिकारी अब्दुल खादर यांचे पुत्र आहेत. वृत्तवाहिन्यांवरील प्राईम टाइम चर्चांमध्ये माकपची भूमिका ठामपणे मांडणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. 2009 मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मुख्यमंत्री कन्या वीणा या एक्सालॉजिक सोल्यूशन या आयटी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. काही मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत या दोघांचा विवाह संपन्न होणार आहे.