Kerala Floods : प्राण वाचवणाऱ्या जवानांचे केरळमधील जनतेने असे मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 03:38 PM2018-08-20T15:38:11+5:302018-08-20T15:38:43+5:30
केरळमध्ये पुरात अडकलेल्या व्यक्तींना लष्कर आणि नौदलाच्या जवानांनी आपल्या प्राणांची बाजी लावून वाचवले. त्यामुळे आता केरळमधील जनतेकडून जवानांचे आभार मानण्यात येत आहेत.
तिरुवनंतपुरम - केरळमध्ये भीषण महापुराने थैमान घातले आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत भारतीय लष्कर, नौदल आणि एनडीआरएफच्या जवानांनी लावून सर्वसामान्यांना मदत केली. अनेक ठिकाणी पुरात अडकलेल्या व्यक्तींना लष्कर आणि नौदलाच्या जवानांनी आपल्या प्राणांची बाजी लावून वाचवले. त्यामुळे आता केरळमधील जनतेकडून जवानांचे आभार मानण्यात येत आहेत. केरळमधील घराच्या छताचा एक फोटो सध्या शेअर होत आहे. ज्यामध्ये एका कुटुंबाने THANKS असे लिहून प्राण वाचवणाऱ्या जवानांचे आभार मानले आहेत.
#OpMadad#KeralaFloodRelief#KeralaFloods2018 A Thank You note painted on the roof of a house where the Naval ALH piloted by Cdr Vijay Varma rescued two women. Bravo... pic.twitter.com/xsaD1RfeIk
— SpokespersonNavy (@indiannavy) August 20, 2018
भारतीय नौदलाच्या ट्विटर हँडलवरून सोमवारी सकाळा एक छायाचित्र शेअर करण्यात आले आहे. यामध्ये एका घराच्या छचावर THANKS लिहिलेले आहे. 17 ऑगस्ट रोजी नौदलाच्या कमांडर विजय वर्मा यांनी या घरातून दोन महिलांना वाचवले होते. आता या परिसरातील पुराचे पाणी ओसरले असून , लोक आपापल्या घरी परतू लागले आहेत. या घरातील व्यक्तींनीही माघारी परतल्यानंतर जवानांचे अशा अनोख्या पद्धतीने आभार मानले आहेत.
पुराने अक्षरशः वेढलेल्या केरळची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शुक्रवार आणि शनिवारी पाऊस कमी झाल्यानं 14 जिल्ह्यांना दिलेला रेड अलर्ट हटवण्यात आला आहे. पाऊस ओसरल्यानं बचावकार्याला वेग आला असला तरी अनेक समस्या केरळमध्ये निर्माण झाल्या आहेत. मुसळधार पावसामुळे केरळमध्ये साथीच्या आजारांचे थैमान सुरू होण्याची भीती केरळच्या आरोग्य खात्याने व्यक्त केली आहे. तसेच पुरात बेघर झालेल्या लाखो लोकांचे पुनर्वसन आणि राज्याचे झालेले कोट्यवधीचे नुकसान यासारख्या असंख्य समस्यांचा सामना केरळला करावा लागत आहे.
साथीच्या आजारांचे थैमान
अस्वच्छ पाणी आणि वातावरणातील बदल यामुळे अनेक आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच आजारांवर नियंत्रण ठेवणे सरकारी पथकांपुढचे मोठे आव्हान ठरणार आहे. उलट्या, जुलाब, व्हायरल फिव्हर आणि अन्य साथीचे आजार पसरायला सुरुवात झाली आहे. तीन जणांना कांजण्याचा संसर्ग झाल्याने त्यांना बचाव शिबिरातून हलवून अन्यत्र ठेवण्यात आले आहे.
बेघर झालेल्या लाखो लोकांचे पुनर्वसन
मुसळधार पावसाने केरळमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. केरळमधील पुरप्रकोपात आतापर्यंत 350 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 3.5 लाख नागरिक बेघर झाले आहेत. केरळमध्ये १०० वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरामुळे सरकारी बचाव शिबिरात 20 लाखाहून अधिक नागरिकांनी आश्रय घेतला आहे. जलप्रलयामुळे हाहाकार माजलेल्या केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ७२ हेलिकॉप्टर, २४ विमाने, ५४८ मोटरबोटी तसेच नौदल, लष्कर, हवाई दल, तटरक्षकदल तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलचे हजारो जवान सहभागी झाले आहेत.