मुंबई : केरळमध्ये 23 जणांचे प्राण वाचविण्यासाठी थेट घराच्या छतालाच हेलिपॅड करणारा धाडसी पायलट दुसरा-तिसरा कोणी नसून महाराष्ट्राचा सुपुत्र आहे. यावेळी एकजरी चूक झाली असती तरीही केवळ तीन सेकंदात होत्याचे नव्हते झाले असते. हा पराक्रम करणारे लेफ्टनंट कमांडर अभिजीत गरुड यांनी आपला केरळमधील बचावकार्याचा थरारक अनुभव सांगितला आणि सबंध महाराष्ट्राचा उर अभिमानाने भरून आला.
केरळमध्ये सलग 9 दिवसांच्या जलप्रलयामुळे उत्पात माजला होता. देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राज्यातील 14 पैकी 11 जिल्हे पुराच्या पाण्याखाली होते. चालाकुढी क्षेत्रामध्ये एका गर्द झाडांनी व्यापलेल्या ठिकाणी 23 जण अडकले होते. त्यांना वाचविणे म्हणजे हेलिकॉप्टर बऱ्याच काळासाठी जमिनीवर उतरविणे गरजेचे होते. मात्र, आजुबाजुला पाणी आणि झाडी असल्याने ते अशक्य होते. यामुळे हेलिकॉप्टर चालविणारे लेफ्टनंट कमांडर अभिजीत गरुड आणि त्यांचे सहकारी पी राजकुमार यांनी हेलिकॉप्टर एका घराच्या छतावर उतरविण्याचा धाडसी परंतू तितकाच धोक्याचा निर्णय घेतला.
घर जरी स्लॅबचे असले तरीही हेलिकॉप्टरच्या हजारो किलोंच्या वजनाने स्लॅब कोसळला असता. यामुळे गरुड यांनी 'लाइट ऑन व्हील्स' म्हणजेच छतावर हलके वजन ठेवत नौदलाचे सी किंग हे हेलिकॉप्टर उडते परंतू स्थिर ठेवले होते. या तारेवरची कसरत असलेल्या स्थितीमध्ये जराजरी चूक झाली असती, तर केवळ 3 सेकंदामध्ये हेलिकॉप्टर होत्याचे नव्हते झाले असते, असा थरारक अनुभव गरुड यांनी सांगितला. हे हेलिकॉप्टर या स्थितीमध्ये तब्बल 8 मिनिटे ठेवण्यात आले होते. यानंतर दोरीने तेथील अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरमध्ये घेण्यात आले व नंतर सुरक्षित स्थळी उतरविण्यात आल्याचे गरुड यांनी सांगितले.
हा धाडसी निर्णय घेणारे लेफ्टनंट कमांडर अभिजीत गरुड कोण आहेत माहित आहे? एअर मार्शल अरुण गरुड यांचे सुपुत्र. या पिता-पुत्रांनी 2015 मध्ये एकत्रित हवाई दलाचे प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे विमान उडविले होते. हा योगायोग त्यांनी चेन्नईयेथील तंबरम हवाई तळावर साधला होता. या काळात त्यांनी शेकडो धाडसी पायलटना प्रशिक्षित करून हवाई दलाच्या सेवेत दिले. यापैकीच अभिजीत गरुड हे एक होत.