लष्करी अधिकाऱ्याचे पत्नीवर गंभीर आरोप; मुलाची डीएनए टेस्ट घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 09:38 AM2021-09-16T09:38:20+5:302021-09-16T09:40:01+5:30
Kerala high court News: याचिकाकर्त्यानुसार त्यांचे लग्न 7 मे 2006 मध्ये झाले होते. तर मुलाचा जन्म 9 मार्च 2007 ला झाला. या काळात तो फक्त 22 दिवस पत्नीसोबत राहिला होता.
केरळच्या उच्च न्यायालयाने (High Court) एका व्यक्तीच्या पत्नीकडून विश्वासघात झालाय हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्या मुलाची डीएनए चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. सैन्यात कार्यरत असलेल्या थिरुवनंतपुरमच्या या व्यक्तीने तो नपुंसक असल्याचे मेडिकल सर्टिफिकेट देखील न्यायालयात सादर केले आहे. न्यायमूर्ती ए मोहम्मद मुश्ताक आणि कौसर एउप्पागथ यांच्या बेंचने हा निर्णय दिला आहे. (Kerala High court order to take DNA test of Child of Army officer.)
सैन्यात कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याने पत्नीने फसवणूक केल्याच्या आधारे तिच्याशी घटस्फोट देण्यात यावा अशी मागणी केली आहे. यामध्ये त्याने पत्नीवर आरोप करताना म्हटले की, पत्नीचे आणि तिच्या बहीणीच्या नवऱ्याचे अवैध संबंध आहेत. तिला जो मुलगा आहे, तो त्याच व्यक्तीचा आहे.
याचिकाकर्त्यानुसार त्यांचे लग्न 7 मे 2006 मध्ये झाले होते. तर मुलाचा जन्म 9 मार्च 2007 ला झाला. या काळात तो फक्त 22 दिवस पत्नीसोबत राहिला होता. नंतर सैन्यातील ड्युटीमुळे लडाखला गेला. त्याचा दावा आहे की, या 22 दिवसांत त्याने पत्नीसोबत एकदाही शारीरिक संबंध ठेवले नाहीत.
यामुळे त्या अधिकाऱ्याने पत्नीने केलेला विश्वासघात सिद्ध करण्यासाठी मुलाची डीएनए टेस्ट करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाने 2014 आणि 2015 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेतला. या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने डीएनए टेस्ट वैज्ञानिक दृष्ट्या अचूक असल्याचे आणि एक योग्य पुरावा असल्याचे मान्य केले होते. यामुळे पती-पत्नींमधील विश्वासघात सिद्ध करता येऊ शकेल. यामुळे केरळ उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या नपुंसक सर्टिफिकेटनुसार हा निर्णय दिला आहे. हे सर्टिफिकेट त्याला थिरुवनंतपुरमच्या मेडिकल कॉलेजच्या एका डॉक्टरने दिले आहे.