काय सांगता? ऊर्जामंत्र्यांनी 30 महिन्यात 34 वेळा बदलले गाडीचे टायर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 10:37 AM2019-10-31T10:37:09+5:302019-10-31T10:38:37+5:30
आरटीआयमधून माहिती समोर आल्यानंतर ऊर्जामंत्री सोशल मीडियावर ट्रोल
थिरुअनंतपुरम: रस्त्यांवरचे खड्डे आणि त्यामुळे सर्वसामान्यांना होणारा मनस्ताप कायम चर्चेचा विषय ठरतो. खड्ड्यांमुळे जीवाला धोका तर निर्माण होतोच. सोबत गाडीच्या दुरुस्तीचा खर्चदेखील वाढतो. अशाच रस्त्यांचा फटका केरळचे ऊर्जामंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते एम. एम. मणी यांना बसला आहे. मणी यांनी गेल्या 30 महिन्यांत 34 वेळा गाडीचे टायर बदलल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली आहे.
कोच्चीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या धनराज एस. पिल्लई यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत केलेल्या अर्जाला पर्यावरण मंत्रालयाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यानं उत्तर दिलं आहे. 'मी बऱ्याचदा सामाजिक प्रश्नांवर आरटीआय दाखल करत असतो. मात्र आता दाखल केलेल्या अर्जाचं उत्तर आल्यावर मला धक्काच बसला. मणी यांच्या दोन वर्ष जुन्या गाडीचे टायर इतक्यांदा बदलण्यात आले आहेत की त्याची सर्वसामान्य व्यक्ती कल्पनादेखील करू शकत नाही,' असं पिल्लई म्हणाले.
पिल्लई यांनी आरटीआयमधून मिळालेलं उत्तर सोशल मीडियावर शेअर केलं. यानंतर नेटकऱ्यांनी ऊर्जामंत्री मणी यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. 'ऊर्जामंत्र्यांची ऊर्जा' अशा शब्दांत अनेकांनी मणी यांची खिल्ली उडवली. त्यांच्याकडे ऊर्जा खातं आहे. त्यामुळे जास्त ऊर्जा तर लागणार ना, मंत्री महोदय रबर उत्पादकांसाठी टायर-योजना चालवण्याचा प्रयत्न करताहेत, अशा प्रतिक्रिया देत अनेकांनी मणी यांना लक्ष्य केलं. तर काहींनी यासाठी रस्त्यांच्या अवस्थेला जबाबदार धरलं.
सोशल मीडियावर टायरचा मुद्दा पेटल्यावर एम. एम. मणी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं. 'मी डोंगराळ भागात राहतो. तिथे टायर लवकर खराब होतो. ट्रोल्सना टीका करायची असल्यास त्यांना आनंद घेऊ दे. मात्र या कालावधीत मी तब्बल 1,24,075 किलोमीटर प्रवास केला आहे. यातील बराचसा प्रवास इडुक्कीच्या डोंगराळ भागातून केला आहे. या परिस्थितीत टायर कमी काळ टिकतो, याची अनेकांना कल्पना आहे,' असं मणी यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.