तिरुअनंतपुरम: बाळाच्या जन्मानंतर आईला पुनर्जन्म मिळतो, असं म्हणतात. केरळमध्ये शब्दश: असाच एक प्रकार घडला आहे. मेंदूच्या दुखापतीमुळे व्हेंटिलेटरवर असलेल्या महिलेच्या प्रकृतीत प्रसूतीनंतर प्रचंड सुधारणा झाल्याचं दिसून आलं आहे. केरळमध्ये ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.जानेवारी महिन्यात बेटिना नावाच्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या मेंदूला दुखापत झाल्यानं शारीरिक हालचालींवर मर्यादा आल्या होत्या. बेटिना यांना अर्धांगवायूचा झटकादेखील आला होता. त्यावेळी त्या तीन महिन्यांच्या गर्भवती होत्या. यानंतर बेटिना यांना दोन महिने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आणि मग त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. बेटिना यांना जिवंत ठेवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांचा पोटातील बाळावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, अशी चिंता डॉक्टरांना सतावत होती. बेटिना घेत असलेल्या औषधांमुळे तिच्या पोटातील बाळाला आजार होऊ शकतो, असा इशारा डॉक्टरांनी तिला दिला होता. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, बेटिनाच्या औषधांचा बाळावर कोणताही परिणाम झाला नाही. 14 जून रोजी सर्जरीच्या माध्यमातून बाळाचा जन्म झाला. बाळाच्या वडिलांनी त्याचं नाव एल्विन असं ठेवलं. एल्विनच्या जन्मानंतर बेटिना कोमातून बाहेर आली. यानंतर तिनं बाळाला आपल्या कुशीतही घेतलं. कित्येक महिन्यानंतर प्रथमच बेटिनाच्या बोटांनी, डोळ्यांनी आणि संपूर्ण शरीरानं हालचाली केली. बाळाच्या जन्मानंतर बेटिना यांच्या प्रकृतीत प्रचंड सुधारणा झाली आणि 10 दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
नवजात बाळानं आईला दिला पुनर्जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 8:03 PM