चंदीगड : पेट्रोलच्या प्रति लिटर १०० रुपयांहून अधिक झालेल्या किमती तसेच वादग्रस्त नव्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ हरयाणातील खाप पंचायतींनी सरकारच्या सहकारी सोसायट्यांना पुरविण्यात येणाऱ्या दुधाचे भाव प्रति लिटर १०० रुपयांपर्यंत वाढविले.पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात काही जणांनी हिसार येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे. नवे कृषी कायदे रद्द करा, अशी भूमिकाही या निदर्शकांनी घेतली आहे. तेल उत्पादक देश अधिक नफा कमाविण्यासाठी सध्या कमी तेलनिर्मिती करीत आहेत. तेलाच्या किमती कडाडण्यामागे असलेल्या अनेक कारणांमध्ये हेही एक महत्त्वाचे कारण आहे, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकतेच सांगितले होते. तेल उत्पादक देशांच्या भूमिकेमुळे इतर देशातील ग्राहकांना महागड्या दरात पेट्रोल विकत घ्यावे लागत आहे, असेही ते म्हणाले. हरयाणातील खाप पंचायतींनी दुधाचे भाव वाढवून तेथील सरकारची कोंडी करण्याचे ठरविले आहे. नवीन कृषी कायदे रद्द करा, या मागणीला हरयाणा सरकार पाठिंबा द्यायला तयार नसल्याने, तेथील शेतकरी संतप्त झाले आहेत. दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनात हरयाणा, पंजाबमधील शेतकऱ्यांचा प्रमुख सहभाग आहे. खाप पंचायतींचा हरयाणाच्या राजकारणावरही मोठा प्रभाव आहे. दूध दरवाढीच्या खाप पंचायतींनी घेतलेल्या निर्णयाचा राज्य व केंद्र सरकारवर किती दबाव येतो, हे काही दिवसात स्पष्ट होईल. (वृत्तसंस्था)
वाढत्या उन्हाबरोबरच आंदोलनही होणार तीव्र नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे आंदोलन वाढत्या उन्हाळ्याबरोबरच आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारविरोधातील संघर्ष टीपेला नेण्यासाठी शेतकरी संघटनांनी मार्च महिन्यात सुमारे १२ महापंचायतींचे आयोजन केले आहे.भारतीय किसान युनियनच्या वतीने देशभरात महापंचायती भरविण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या सर्व महापंचायतींमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत सहभागी होणार आहेत. १ मार्च रोजी उत्तराखंडच्या उधमसिंहनगर येथील रुद्रपूरमध्ये महापंचायत होईल.