देहरादून, दि. 18 - चहाच्या टपरीवर दोन व्यक्तींमध्ये झालेल्या चर्चेमुळे देहरादूनमधील एका मोठ्या किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. दोन टॅक्सी चालकांमध्ये ही चर्चा सुरु होती. गंगोत्री चॅरिटेबल रुग्णालयात किडनी डोनर्सना घेऊन जाण्याबद्दल हे दोघे बोलत होते. यावेळी तिथे साध्या कपड्यांमध्ये उपस्थित असणा-या पोलीस कॉन्स्टेबलने त्यांचं सर्व बोलणं ऐकून घेतलं होतं. यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात करत किडनी रॅकेटचा पर्दाफाश केला.
एका महिन्यापुर्वीच कॉन्स्टेबल पंकज शर्मा यांची हरिद्वार येथील राणीपूर पोलीस ठाण्यात पोस्टिंग झाली होती. चहाच्या टपरीवर बसून चहा पित असताना तिथे दोघेजण रुग्णालयात चालणा-या बेकायदा गोष्टींवर बोलत असल्याचं त्यांना ऐकू आलं. पंकज शर्मा साध्या कपड्यांमध्ये असल्याने त्या दोघांनाही एका पोलिसाला आपण ही माहिती देत आहोत हे लक्षात आलं नाही. कॉन्स्टेबल पंकज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीची ही गोष्ट आहे. रस्त्याशेजारी असणा-या टपरीवर मी सकाळचा चहा घेत होतो. तेव्हा तिथे उभे असणारे दोघे रुग्णालयात चालणा-या बेकायदा गोष्टींवर बोलत होते. दोघेही अवयव तस्करीवर बोलत होते. पण त्यांनी रुग्णालयाचं नाव घेतलं नव्हतं'.
संशय वाढल्याने पंकज शर्मा यांनी आपले वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक अभिनव शर्मा आणि पोलीस निरीक्षक प्रदीप बिस्त यांना ही माहिती दिली. त्यांनीही गांभीर्य लक्षात घेत तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिक्षक कृष्णा कुमार व्ही के यांना ही माहिती पुरवली. पोलीस अधिक्षक कृष्णा कुमार यांना सांगितल्यानुसार, 'आपल्या परिसरात ऑर्गन रॅकेट सुरु असल्याची माहिती मला देण्यात आली. काही लिड्स मिळाले होते, पण खूप काही अस्प्ष्ट होतं. रुग्णालय किंवा यात सामील व्यक्तींबद्दल काहीच माहित नव्हतं. तरीही मी हातात असलेल्या माहितीच्या आधारे तपास करण्यासाठी एक टीम तयार केली'.
पोलिसांनी खब-यांची मदत घेतली आणि शेवटी गंगोत्री चॅरिटेबल रुग्णालयात येऊन पोहोचले. मात्र अद्यापही आरोप सिद्ध करण्यासाठी पोलिसांच्या हाती कोणतेही पुरावे नव्हते. तब्बल एक महिना पोलीस पुरावे गोळा करत होते. शेवटी 10 सप्टेंबर रोजी डोनर्सना एका गाडीतून रुग्णालयात नेलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे हरिद्वार पोलिसांना कारवाई करत पाच जणांना अटक केली. अटक करणा-यांमध्ये मुख्य आरोपी अमित कुमारचा विश्वासू जावेद खानही होता. डोनर्सची व्यवस्था करण्याची जबाबदारी जावेद खानवर होती.
हे रॅकेट उद्धवस्त करण्यामध्ये कॉन्स्टेबल पंकज शर्मा यांनी महत्वाची भूमिका बजावली. पंकज शर्मा यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळेच गुन्ह्याचा उलगडा झाला. हरिद्वार पोलिसांनी मेडलसाठी पंकज शर्मा यांच्या नावाची शिफारस केली असून, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाला त्यांचा गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे.