नवी दिल्ली, दि. 18 - गाडी पार्किंगवरुन उदभवलेल्या वादात स्विफ्ट कार चालकाच्या मदतीसाठी गेलेल्या दोघा युवकांवरच पाचजणांनी चाकू हल्ला केला. यात एका युवकाचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. पूर्व दिल्लीत गीता कॉलनीमध्ये एका हॉटेलबाहेर शनिवारी रात्री ही घटना घडली. निशांत अरोरा असे मृत युवकाचे नाव असून, दुसरा युवक गौरव शर्मा गंभीर जखमी झाला आहे.
आरोपींनी स्विफ्ट कारच्या चालकाला गाडी काढण्यास सांगितली. पण कार चालकाने नकार दिल्यानंतर वादाला सुरुवात झाली. यावेळी वादात हस्तक्षेप करणा-या युवकांवर आरोपींनी चाकूने वार केले. निशांत आणि गौरव रक्ताच्या थारोळयात खाली कोसळल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले असे पोलिसांनी सांगितले. हे आरोपी अद्याप सापडलेले नाहीत. हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या रिक्षा चालकाने जखमी युवकांना तात्काळ हेडगेवार रुग्णालयात दाखल केले अशी माहिती हॉटेलचे मालक गुलशन काथुरीया यांनी दिली.
प्रत्यक्षदर्शींनी पीसीआरवरुन फोन केल्यानंतर पोलिसांना या वादावादीची माहिती मिळाली. निशांत अरोरा (26) या युवकाला तपासल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. गौरव शर्माची (27) प्रकृती चिंताजनक असून, त्याचा आयुष्यासाठी संघर्ष सुरु आहे. शनिवारी रात्री उशिरा पाच युवक बाईकवरुन गीता कॉलनीतील हॉटेलजवळ आले. त्याचवेळी एक स्विफ्ट कारही तिथे आली.
स्विफ्ट कारमुळे पार्किंगला जागा मिळत नसल्याने बाईकस्वारांनी हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली. त्यांनी स्विफ्ट चालकाला गाडी मागे घ्यायला सांगितली. पण कार चालक नविन कुमारने पार्सल पॅक होईपर्यंत बाईकस्वारांना थांबण्यास सांगितले. माझ्या गाडीच्या बाजूला पुरेशी जागा होती तिथे ते गाडी पार्क करु शकत होते असे नविन कुमारने सांगितले.
मी तिथून गाडी काढावी यासाठी त्यांचा खटाटोप सुरु होता. मी गाडी काढायला नकार दिला तेव्हा हे पाचही जण माझ्या अंगावर धाऊन आले. त्यावेळी तिथे असणारे चार जण माझ्या मदतीसाठी आले असे कुमार यांनी सांगितले. परिस्थिती हाताबाहेर जातेय हे लक्षात येताच मी गाडी तिथून काढली व पार्किंगसाठी दुसरी जागा शोधली. मी परत येत असताना आता सर्व काही शांत झाले असेल असे मला वाटले पण घटनास्थळी दुसरेच चित्र होते. निशांत आणि गौरव रक्ताच्या थारोळयात पडले होते. आरोपी तिथे कुठेही दिसत नव्हते असे नविन कुमारने सांगितले.